वानवडी: वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वानवडी येथील फातिमानगर चौक सिग्नल मुक्त करण्यात आला आहे. मात्र, हा बदल करताना वाहतूक पोलिसांकडून पादचार्यांच्या सुरक्षेचा विचार झाला नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
कारण चौकातील वाहतुकीचा वेग वाढल्याने पादचार्यांना रस्ता ओलांडणे अवघड होऊन बसले आहे. तसेच अपघाताचा धोकाही नाकारता येत नाही. पादचार्यांसाठी पर्यायी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा; अन्यथा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे. (Latest Pune News)
सोलापूर रस्ता व विठ्ठलराव शिवरकर रस्त्यांवर होणार्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी फातिमानगर चौकातून हडपसरकडे (उजवीकडे) वळण्यास बंदी घातली असून वाहतूक एकेरी केली आहे.
भैरोबानालाच्या बाजूने आल्यास चौकातून वानवडीकडे जाण्यासाठी, तसेच शिवरकर रस्त्यावरुन हडपसरकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शिवरकर रस्त्यावरुन चौकात आल्यावर डावीकडे वळून भैरोबानाला चौकातून युटर्न घेऊन हडपसरकडे जावे लागत आहे. तसेच हा चौक सिग्लन मु्क्त करण्यात आला आहे. मात्र हा बदल नियोजनबद्ध नसल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडल असल्याचे नागरिकांनी सांगितले.
फातिमानगर परिसरातील हिमालय, हिमालया, मिहीर, पंचरत्न आदी सोसायट्यांतील ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच माजी नगरसेविका कालिंदा पुंडे यांची भेट घेऊन चौकात पादचार्यांच्या गैरसोयबद्दल तक्रारी मांडल्या. या चौकातील वाहतूक बदल करण्यात आल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि पादचार्यांना रस्ता ओलांडणे अवघड होऊन बसले आहे. प्रशासनाच्या विचित्र खेळात आमचा जीव जाईल, अशी कैफीयत या वेळी ज्येष्ठ महिलांनी मांडली. या वेळी आशा शिंदे, नजीर खान, सादीक पठाण, सुशांत दुबे, नरेश भाटी, जमीर शेख आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचे शहर सरचिटणीस अॅड. महेश पुंडे म्हणाले की, फातिमानगर चौकातील प्रश्नाबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार सुनिल कांबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, यावर लवकरच मार्ग निघणार आहे.
फातिमानगर चौकातील वाहतुकीत बदल केल्याने विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. या ठिकाणी पादचार्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरवा सुरू आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार सुनिल कांबळे यांची भेटू घेऊन ही समस्या सोडविण्यात येईल.कालिंदा पुंडे, माजी नगरसेविका