Pharmacy Council Of India Pudhari
पुणे

PCI Aadhaar Biometric Attendance Rule: फार्मसी महाविद्यालयांसाठी आधार-लिंक बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची

१ मार्चपर्यंत नोंदणी पूर्ण न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशबंदीचा इशारा; पीसीआयचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात पीसीआयने देशातील सर्व मान्यताप्राप्त औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांना आधार लिंक बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची (एईबीएएस) नोंदणी व त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया 1 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत; अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मान्यता देण्यात येणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया बंधनकारक केली आहे. त्यानंतर विविध परिपत्रकांद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, अद्याप अनेक संस्थांनी नोंदणी व प्रणाली कार्यान्वयन पूर्ण केली नसल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे. 1 मार्चपूर्वी मान्यताप्राप्त बायोमेट्रिक यंत्रे खरेदी करून बसविणे व त्यांची नोंद परिषदेच्या केंद्रीकृत उपस्थिती संकेतस्थळावर करावी. सर्व प्राध्यापक व अध्यापक कर्मचाऱ्यांची (वैध ओळख क्रमांकासह) केंद्रीकृत उपस्थिती प्रणालीवर नोंदणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

मान्यताप्राप्त बायोमेट्रिक यंत्रांची खरेदी व इन्स्टॉलेशन संस्थेने करावे तसेच ‌‘डीजी-फार्ड‌’ संकेतस्थळावरील ‌‘एईबीएएस‌’ विभागात त्याची नोंद अद्ययावत करावी. संस्थात्मक नोंदणी करून सर्व अध्यापकांची (वैध बीएच-पी ओळख क्रमांकासह) केंद्रीकृत एईबीएएस संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करावी. सर्व अध्यापकांची पडताळणी करून त्यांना सक्रिय करणे व यंत्रांसोबत जोडावे; अन्यथा येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशबंदीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

तक्रारींसाठी संकेतस्थळावर अर्ज करावा

अधिकृत अध्यापकांनी नियमितपणे बायोमेट्रिक यंत्रावर उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी संबंधित संस्थांनी परिषदेच्या तक्रार निवारण संकेतस्थळावर अर्ज करावा, असेही कळविण्यात आले आहे. परिषदेचे निबंधक आणि सचिव अनिल मित्तल यांनी सर्व संस्थांनी मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT