कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः कुंडेश्वर डोंगर परिसरात पडत असलेल्या पावसाने कडूस (ता. खेड) गावाला वरदान ठरलेला २.६२ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला गावचा पाझर तलाव मंगळवारी (दि. १) दुपारी ५ वाजेच्या दरम्यान १०० टक्के भरला. तलावाच्या सांडव्यावरून कुमंडला नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासांमध्ये ३ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने पाझर तलावात पाण्याची आवक कमी-जास्त होत आहे. या पाझर तलावाला स्वयंचलित दरवाजे नसल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे कुमंडला नदी प्रवाहित झाली आहे. परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांचा पाण्याचा एकमेव आधार असलेला पाझर तलाव मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरला. मागील वर्षी दि. १३ जुलै रोजी हा पाझर तलाव भरला होता. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेने तब्बल १९ दिवस उशिरा भरला आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात परिसरात पडत असलेल्या पावसाने श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे उगम पावलेल्या कुमंडला नदीचे पात्र भरून वाहत असल्याने रौंधळवाडीचा पाझर तलाव दि. २० जुलै रोजी १०० टक्के भरला आहे. कोहिंडे बुद्रुक, रौंधळवाडी, कंदवाडी बंधाऱ्याचे संपूर्ण पाणी कडूस गावच्या पाझर तलावाला मिळत असल्याने कडूस, गारगोटवाडी परिसरातील हजारो हेक्टर शेत जमिनीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, शेतकरीबांधवांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा :