पुणे : शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पुन्हा ‘पे अँड पार्क’ योजना सुरू केली आहे. सुरुवातीला प्रमुख पाच रस्त्यांवर ही योजना राबवली जाणार असून, याची निविदा देखील काढण्यात आली आहे. या रस्त्यांवर तब्बल 6,344 दुचाकी आणि 618 चारचाकी पार्किंगची सोय उपलब्ध होणार आहे, तर 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील वाढत्या वाहनसंख्येला शिस्त लावण्यासाठी सात वर्षांनी महापालिकेने ’पे अँड पार्क’ योजना पुन्हा सुरू केली आहे. सुरुवातीला जंगली महाराज रस्ता, एफ. सी. रोड, लक्ष्मी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट, विमाननगर रस्ता आणि बिबवेवाडीतील मुख्य रस्ते या पाच महत्त्वाच्या ठिकाणी पे अँड पार्क केले जाणार आहेत. यासाठी महापालिकेने निविदा जाहीर केल्या आहेत.
या निविदांनुसार या मार्गांवर 6,344 दुचाकी व 618 चारचाकी पार्किंगची सोय उपलब्ध होणार आहे. यातून महापालिकेला अंदाजे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 2018 मध्ये सर्वसाधारण सभेने पार्किंग धोरणाला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव सात वर्षे रखडला होता. आता मुहूर्त लागत दुचाकीसाठी प्रतितास 4 रुपये, तर चारचाकीसाठी 20 रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. दिवसभरातील 14 तासांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नुकतीच नियमावलीला मंजुरी दिली आहे. ठेकेदाराने मनुष्यबळ, मशिनरी, गणवेश आणि देखभाल खर्च स्वतःकडून करायचा असून, त्यासाठी स्वतंत्र नियमावलीही तयार करण्यात आली आहे.
निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्त होणारे ठेकेदार पार्किंग व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणार आहेत. यामुळे वाहतुकीला शिस्त येण्याबरोबरच प्रमुख रस्त्यांवरील कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा दावा आहे.