पुणे

पवना बंदिस्त जलवाहिनी : प्रकल्प रखडल्याने दुपटीने वाढला खर्च

अमृता चौगुले

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प तब्बल 12 वर्षे रखडल्याने 400 कोटी खर्चाचे हे काम आता 800 कोटींवर जाऊन पोहोचले आहे. उर्वरित भूमीगत जलवाहिनी टाकणे, जॅकवेल आणि ब्रेकप्रेशर टँकचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंवड शहराला शुद्ध पाणी मिळू शकेल.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांवर गेली आहे. महापालिकेत हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे, पुणे शहरातील दिघी, कळस व बोपखेलचा परिसर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा भाग शहरात समाविष्ट होणार आहे. शहराला पाणी कमी पडत असल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अत्यावश्यक आहे.

या प्रकरणी दै. पुढारीने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून शहराशी निगडित असलेल्या पाणीप्रश्नावर सातत्याने वाचा फोडली आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा वाद काही मिटेना ! असे ठळक वृत्त 9 ऑगस्ट 2023 ला प्रसिद्ध केले होते. अखेर, या प्रकल्पावरील स्थगिती उठल्याने शहरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मात्र, तब्बल 12 वर्षे प्रकल्प रखडल्याने कामाचा खर्च दुपटीपेक्षा अधिक वाढणार आहे. हे काम सन 2008 ला 397 कोटी 92 लाख खर्चात करण्यात येत होते. त्यासाठी केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएमने 116 कोटी 92 लाख, राज्य शासनाने 96 कोटी 77 लाख रुपयांचा निधी दिला आहे. उर्वरित 234 कोटी 30 लाखांचा खर्च महापालिका करणार होती.

मात्र, प्रकल्प रखडल्याने ठेकेदाराने काम बंद करून बिल अदा करण्याची मागणी 25 मार्च 2019 ला केली. संबंधित ठेकेदारालाच नव्याने काम देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. भाववाढ झाल्याने हे काम आता 800 कोटींपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे महापालिकेस खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

कामासाठी सल्लागार, ठेकेदार नेमावा लागणार
प्रकल्पावरील स्थगिती उठल्याने आता या प्रकल्पासाठी सल्लागार व ठेकेदार नेमावा लागणार आहे. पूर्वी असलेली युनिटी कन्सल्टंट ही सल्लागार एजन्सी या कामासाठी कायम ठेवण्यात आली आहे. पूर्वीचेच एनसीसी एसएमसी इंदू या ठेकेदार कंपनीस पुन्हा काम देण्याचे महापालिका प्रशासनाने नियोजन आहे. ती कामे पूर्ण करण्यास किमान 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण झाल्या
वर्षभर पवना नदीत पाणी असावे म्हणून महापालिकेकडून पवना नदीवर गहुंजे व शिवणे येथे कोल्हापुरी पद्धतीचा नवा बंधारा बांधून देण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने 28 कोटी 78 लाख खर्च केला आहे. पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तीन शेतकर्‍यांच्या वारसांना महापालिकेने नोकरी दिली आहे. तसेच, जलसंपदा विभागाकडून कोल्हापूर पद्धतीचे दोन नवीन बंधारे बांधण्यात
येत आहेत.

लोखंडी पाईपची तोडफोड
या प्रकल्पासाठी 1,800 मिलिमीटर व्यासाचे, 12 मीटर लांबीचे, 10 व 12 मिलिमीटर जाडीचे एकूण 2 हजार 169 लोखंडी पाइप आणून ठेवले आहेत. हे पाइप मावळ तालुक्यातील खासगी जागेत आहेत. त्याचे जागा भाडे व सुरक्षा खर्च महापालिका करीत आहे. बंदिस्त गोदामात 244 व्हॉल्व्ह, 6 पंप्स, 12 विद्युत मोटर्स, विद्युतविषयक 50 व्हॉल्व्ह, 32 ट्रॉन्सफार्मर व इतर विद्युतजोडणीचे साहित्य आहे. हे साहित्य सन 2008-09 ला घेण्यात आले आहे. काही लोखंडी पाईपची चोरी झाली असून, तोडफोड झाली आहे. तर, काही गजले आहेत. त्या पाईपची चाचणी करून कोटींग करून वापरण्यात येतील. जुने व खराब झालेले साहित्य दुरुस्त व अपग्रेड करून घ्यावे लागणार आहे. त्यांचा खर्चही वाढणार आहे.

ही कामे प्रलंबित
पवना धरण ते निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 34.71 किलोमीटर किलोमीटर अंतर समांतर जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यापैकी 4.40 किलोमीटर अंतराचे पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील काम झाले आहे. उर्वरित 30.31 किलोमीटर अंतर 1,800 मिलिमीटर व्यासाची समांतर जलवाहिनी टाकायची आहे. सर्व जागा ताब्यात आहे. तर, ऊर्से हद्दीतील 3.43 किलोमीटर अंतराची जागा अवार्ड झाली आहे. केवळ ताब्यात घेणे बाकी आहे. तसेच, धरणाजवळ अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यास येणार आहे. त्यासाठी जॅकवेल, पंपिंग स्टेशन व ब्रेकप्रेशर टँक काम बांधण्यात येणार आहे. धरणातून 610 एमएलडी पाणी उचलून या जॅकवेलद्वारे जलवाहिनीत पाणी सोडले जाईल. जलशुद्धीकरणात त्यावर प्रक्रिया करून ते पाणी शहराला पुरविले जाईल.

पवना बंद जलवाहिनीचा घटनाक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात प्रकल्पास मंजुरी
प्रकल्पाचा खर्च 397 कोटी 92 लाख
वर्कऑर्डर 30 एप्रिल 2008 रोजी
एनसीसी-एसएमसी-इंदू ठेकेदार
34.71 किमी. अंतराच्या समांतर जलवाहिनी कामाची मुदत 2 वर्षे
शहरात 4.40 किमी. अंतर जलवाहिनी टाकली
प्रकल्पाचे 12.62 टक्के काम पूर्ण
प्रकल्पाविरोधात 9 ऑगस्ट 2011 ला बऊर टोलनाका येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको
पोलिसांच्या गोळीबारात 3 शेतकरी ठार, काही जखमी
तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून कामास स्थगिती
अंतिम बिल अदा करण्याची ठेकेदाराची 25 मार्च 2019ला महापालिकेस नोटीस
8 सप्टेंबर 2022 ला स्थगिती उठविली

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT