दीपक सोनवणे
पौड: मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटात आरक्षण सोडत होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत प्रचाराची राळ उडवून दिली आहे. पूर्वी असलेल्या पौड-कासारआंबोली जिल्हा परिषद गटातून या वेळी कासारआंबोली गाव वगळून नवीन पौड-अंबडवेट हा जिल्हा परिषद गट तयार करण्यात आला आहे.
यामध्ये अंबडवेट ग्रामपंचायत हद्दीपासून ते काशिग-पौड-आदरवाडी ते आंबवणेपर्यंतचा भाग तसेच मुळशी धरणाच्या दोन्ही बाजूंचा परिसर येत असल्याने भौगोलिकदृष्ट्या हा जिल्हा परिषद गट तालुक्यात मोठा आहे. अंबडवेट पंचायत समिती आणि पौड पंचायत समिती असे दोन गण यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. (Latest Pune News)
सन 2019 मध्ये या जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे सागर काटकर विजयी झाले होते, तर कासारआंबोली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे सचिन साठे आणि पौड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग््रेासच्या कोमल वाशिवले ह्या विजयी झाल्या होता. कासारआंबोली पंचायत समिती असलेल्या गणातून कासारआंबोली हे गाव वगळून आता ते पिरंगुट गणाला जोडण्यात आलेले असून, आता नव्याने तयार झालेल्या अंबडवेट गणात पौड गणातील संभवे, भादस-शिळेश्वर, असदे, खुबवली आणि रावडे ही गावे वगळून अंबडवेट गणाला जोडण्यात आलेली आहेत.
पुढील चार ते पाच महिन्यात केव्हाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर होऊ शकतो. मात्र त्याआधी गट आणि गणनिहाय आरक्षण जाहिर होणे बाकी आहे. परंतु आरक्षण जाहिर होण्यापूर्वीच पौड जिल्हा परिषद तसेच पौड आणि अबंडवेट पंचायत समिती गणात इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी गणेशोत्सव, आरती आणि साजरे होत असलेले वाढदिवसासाठी इच्छूक उमेदवार आपली हजेरी लावत असून भाषणाच्या संधीचे आपल्या उमेदवारीसाठी सोने करत आहे.
या वेळी दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असे सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून, इतर छोटे पक्ष तसेच काही अपक्ष देखील आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करणार आहेत. या वेळी उमेदवारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये कमी मताचे अंतर राहण्याची शक्यता असून, मोठया मताधिक्यांनी निवडून येण्याची शाश्वती या वेळी कोणीही देऊ शकत नाही.
मी नाही, तर पत्नी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचे आरक्षण अजून नक्की झालेले नाही, तरीदेखील काही जणांनी गाठीभेटी घेणे सुरू केलेले आहे. पुरुष आरक्षण पडले नाही व महिला आरक्षण पडले, तर माझ्याऐवजी माझी पत्नी निवडणूक लढणार, अशीही तयारी काही जणांनी केलेली दिसून येत आहे.
कीर्तनसेवेचे व आरोग्य शिबिरांचे आयोजन
मुळशी तालुक्यात कुस्ती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा आहे. हीच संधी साधत काही उमेदवार कीर्तनसेवेचे आयोजन करीत आहेत, तर काही उमेदवार आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांना विविध रोगांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करून देत आहेत.