पुणे

Sasoon Hospital : ससून गेटवेल सून ! रुग्णांच्या सहनशक्तीची होतेय परीक्षा

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा : तुम्ही ससून रुग्णालयात उपचारानिमित्त येणार असाल, तर तुमच्याकडे प्रचंड सहनशक्ती पाहिजे. तुम्हाला जागोजागी मनस्ताप सहन करावा लागेल. पण, तुम्हाला डॉक्टरांना भेटाचे असल्याने तुम्ही शांत राहा. अशीच परिस्थिती प्रत्येक रुग्णाला ससूनमध्ये आल्यानंतर अनुभवण्यास येत असल्याचे दै. 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत समोर आले. त्यामुळे तुम्ही रुग्ण असाल, तर गैरसोय होणार आणि रुग्णासोबत आलेला असाल तर तुमची फरपट ठरलेलीच.
अस्थिरोग विभागात जाण्यासाठी हाडं दुखली तरी करा पायपीट
ससूनमध्ये गेल्यानंतर आधार कार्ड आणि वीस रुपये रोखीने देऊन केसपेपर मिळाला. तो घेऊन अस्थिरोग विभागाच्या 35 क्रमांकाच्या खोलीत जाण्यास सांगितले. पण, हा विभाग सध्या जुन्या इमारतीमध्ये नाही. तुमची हाडे कितीही दुखत असली, तरी तुम्हाला जवळपास अर्धा किलोमीटर नवीन इमारतीपर्यंत चालत जावे लागते. तुम्हाला ससून रुग्णालयाची माहिती नसेल तर केसपेपर मिळाल्यानंतर क्रमांक 35 कुठे आहे? याची विचारपूस करावीच लागते. सुरक्षारक्षकांना कुठला विभाग कुठे आहे? याची माहिती असल्याने त्यांची मदत होते. केसपेपर घेऊन बाहेर उजव्या बाजूला वाहनतळाकडे जावे लागते. जवळ असेल असा अंदाज तुमचा फोल ठरतो. हाडे दुखली तरी तुम्हाला चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. कारण, तुम्ही तुमचे वाहन पे अँड पार्कमध्ये पैसे खर्च करून उभे केलेले असते. पूर्वीच्या आपत्कालीन विभागाचे डागडुजीचे काम सुरू असून, त्या बांधकामासाठी बाजूला पडलेल्या क्रशवरून चालत जावे लागते. वाहनतळाच्या व्यवस्थेसाठी रस्सीने अर्धा रस्ता बंद केलेला असल्याने तुम्हाला वाहने ये-जा करणार्‍या रस्त्यावरूनच हाडांचे दुखणे सांभाळत पुढे जावे लागते. पुढे विद्युत विभागाच्या छोट्या खोलीत दोघे निवांत बसलेले असतात. ससूनमध्ये गर्दी नसलेली रूम दिसली ती एवढीच. थोड्या अंतरावर 'अकरा मजली नवीन इमारत' असा दिशादर्शक फलक दिसला. डावीकडे आणि मग पुन्हा उजवीकडे वळून एका छोट्याशा खोलगट भागानंतर नवीन सुसज्ज इमारतीसमोर तुम्ही पोहचता. अस्थिरोग विभाग तळमजल्यावरच असल्याने सुटकेचा नि:श्वास सोडून डॉक्टरांकडे जाता आले.
जगभर डिजिटलचा बोलबाला; ससूनमध्ये रोखीनेच व्यवहार
बँकेतून पैसे भरणे आणि काढण्यापासून चहाच्या टपरीवरही ऑनलाइन पैसे स्वीकारले जातात, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले आहे. मात्र, याला ससून रुग्णालय अपवाद ठरले आहे. येथे केसपेपर काढण्यापासून ते डिस्चार्ज मिळण्यापर्यंत सर्व आर्थिक व्यवहार हे रोखीनेच करावे लागतात. ज्यांच्याकडे रोख रक्कम नाही अशा रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसोय होत आहे. ससून रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या सर्वांना सर्वप्रथम अर्धा तासापेक्षा अधिक वेळ रांगेत थांबून 20 रुपये रोख देऊन केसपेपर घ्यावा लागतो. त्याचवेळी रोख पैसे नसतील तर मात्र बाहेर जाऊन पैसे आणावे लागतात. त्यानंतर पुन्हा एकदा रांगेत थांबून केसपेपर घ्यावा लागतो. ज्या विभागात ओपीडीसाठी जायचे आहे, त्या विभागात पुन्हा रांग असते. डॉक्टर आवश्यकतेप्रमाणे रुग्णाला वेगवेगळ्या चाचण्या करायला सांगतात. परंतु, एका ठिकाणी चाचण्या होत नसल्याने संपूर्ण दिवस त्यामध्येच जातो, तर काही रुग्णांना चाचण्यांसाठी दुसर्‍या दिवशी यावे लागते.
केसपेपर घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदार महिला, पुरुष, महिला, अशा एकूण 11 खिडक्या असून, त्यातील सहा खिडक्या सुरू आहेत, तर पाच खिडक्या बंद असल्याचे दिसून आले. या ठिकाणी रांगेत थांबल्याशिवाय ते मिळत नाही. विशेष म्हणजे, एककेस पेपर सात दिवस चालतो. परंतु, त्यावर आजच्या तारखेचा शिक्का घेण्यासाठी पुन्हा रांगेत थांबावे लागते.
रुग्णालयात केसपेपर घेण्यासाठी प्रवेश केल्यानंतर रुग्ण आणि नातेवाइकांना बसण्यासाठी अपुरी सुविधा असल्याने फरशीवरच बसावे लागते. तसेच, त्याच ठिकाणी रक्तातील साखर तपासणीसाठी टेबल लावण्यात आले आहेत. सकाळी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्याची वेळ असते, तर दुसरीकडे ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे आत जाण्यासाठी रस्ताही नसतो. या ठिकाणी सुरक्षारक्षक असतात. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याचे दिसून आले.
इथे स्वच्छता कोण करणार?
ससून रुग्णालयाच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून, यात दंत विभागात कचरा, मावा खाणार्‍यांच्या पिचकार्‍या आणि येथे असणारी भयाण शांतता, यामुळे हा विभाग आहे की एखादी पुरानी हवेली, असाच भास येथे गेल्यावर होतो. रुग्णालयातील दंत विभागासह अन्य विभागांत कामकाजाचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. या वेळी केलेल्या पाहणीदरम्यान येथील गर्दी रोखून वेटिंग कमी करणे, शिस्तबध्द नियोजन, स्वच्छता राखणे, सुसज्ज अशा वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करून देणे, कर्मचार्‍यांचा उद्धटपणा थांबवून त्यांना कामाबाबतची शिस्त लावण्याची गरज असल्याचे दिसले. ससून रुग्णालयातील 'दंत विभाग' मागील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या जिन्यावर अनेक ठिकाणी गुटखा खाणार्‍यांनी पिचकार्‍या मारून परिसर विद्रूप केला आहे. पहिल्या मजल्यावर गेल्यावर तुटलेल्या काचा, कचरा पडल्याचे बघायला मिळाले.
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT