पाटस: जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील ४८ किमी अंतराचा दोन दिवसीय मुक्काम उरकण्यासाठी पाटस येथील दुपारचा विसावा घेऊन पूर्वी अवघड ठरणारा रोटी घाट पालखी रथाला जास्तीच्या सहा बैलजोड्यांची म्हणजे १२ बैलांची मदत घेऊन रोटी घाट पार करून पुढील मुक्कामासाठी रवाना झाला. गेल्या वर्षी पालखी रथाला जादाच्या तीन बैल जोड्या लावून घाट पार केला होता.
पाटस (ता. दौंड) येथील ग्रामदैवत नागेश्वर मंदिरातून सकाळी ११ वाजता जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बाहेर निघाला.पालखी मार्गाचे घाटातील काम झाल्याने सहज रित्या पालखी सोहळ्याला घाट पार करता येत असल्याने पालखी रथाला सहा बैलजोड्यांच्या मदतीने म्हणजे १२ बैलांच्या मदत घेऊन रोटी घाट पार केला व हा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची येथील मुक्कामासाठी गेला आहे. (Latest Pune News)
कडक उन्हाळ्याच्या दिवसात पंधरा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने रोटी घाट परिसर पूर्णपणे हिरवाईने नटलेला गेला असल्याने यंदा पालखी सोहळा नागरिकांना रोटी घाट वेगळेच धार्मिक चैतन्य निर्माण करीत समाधान देऊन गेला. अनेकांनी रोटी घाटातील पालखी सोहळ्याचे मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यासह मोबाईलमध्ये कैद करत सेल्फी काढल्या.
हिरवाईने नटलेल्या परिसरातील नागमोडी वळणाच्या रोटी घाटात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास दाखल झाला. पालखी सोहळ्याच्या जादाच्या सहा बैल जोड्यांची मदत घेऊन रोटी घाट पार केला. रोटी घाटात टाळ-मृदुंगात विठ्ठल पांडुरंग, संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत अवघा घाट दुमदुमून गेला होता.
दौंड तालुक्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या सहवासाने तालुक्यात भक्तिमय वातावरण करून तालुक्यातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा रोटीच्या नागमोडी वळण घाट पार करून रोटी (ता. दौंड) येथे अभंग, आरती करीत हिंगणीगाडामार्गे वासुदे (ता. दौंड) येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे मुक्कामासाठी गेला.
सहा बैलजोड्यांनी रोटी घाट पार करताना चे ऐतिहासिक व निसर्गरम्य दृश्य दौंड तालुकासह बारामती, इंदापूर, कर्जत, श्रीगोंदा, शिरूर, हवेली या तालुक्यांतील तसेच बाहेरील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटी गावच्या हद्दीत हा पालखी सोहळा गेल्याने रोटी ग्रामस्थांनी अभंग, आरती केली पालखी सोहळ्याने तिसरा विसावा घेतला आहे. दौड तालुक्यात पालखी सोहळ्याने दोन दिवसांचा मुक्काम केला.
दौंड तालुक्यातील बोरीभडक ते वासुंदे यादरम्यानचा प्रवास करीत ४८ किलोमीटर अंतराचा टप्पा पालखी सोहळा बुधवारी (दि. २५) संध्याकाळ पर्यंत पार करणार आहे. पाटस येथे पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी कुसेगाव, पडवी, कानगाव, गार, गिरीम, सोनवडी दौंड तसेच पूर्वेकडील गावे, कुरकुंभ रावणगाव मळद पासून भिगवण पर्यंतची गावे तसेच शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा, शिरसगाव, वडगाव, सादलगाव तसेच बारामती तालुक्यातील सुपे, मोरगाव, भोंडवेवाडी परिसरातील नागरिक आले होते.