पुणे

पुणे : दहावीतून सुटलो, आता अकरावीची तयारी; प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अमृता चौगुले

पुणे : दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शनिवारी यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. ही प्रक्रिया गुरुवारपासून (दि. 8 जून) सुरू होणार असून, 18 जुलैला संपणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात कॅप आणि कोटा फेरीच्या पहिल्या फेरीचे सविस्तर, तर पुढील फेर्‍यांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना 8 जूनपासून अकरावी प्रवेशाचा भाग 2 भरता येणार आहे. पुण्यात 42 हजार 261 विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी नोंदणी केली आहे. त्यातील 24 हजार 690 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. त्यातील 10 हजार 917 विद्यार्थ्यांनी अर्ज अ‍ॅटो-व्हेरिफाइड केले आहेत. पडताळणी केंद्रावर जाऊन 9 हजार 92 विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केल्याचे अकरावीच्या पोर्टलवरील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

असे होतील कोटा प्रवेश

कोटा प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांना 8 ते 12 जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पसंती नोंदवायची आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिंटआउट घेऊन ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. त्यानंतर महाविद्यालयांकडून 13 जून रोजी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 16 ते 18 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना कोटाअंतर्गत नोंदविलेली पसंती बदलता येईल.19 जून रोजी पुन्हा विद्यालयांना यादी प्रसिद्ध करता येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना 19 ते 22 जूनदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागणार आहेत. 23 जूनला महाविद्यालये कोटाअंतर्गत रिक्त जागा जाहीर करणार आहेत.

नियमित पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे : 8 ते 12 जून
अर्ज भाग 1 भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे : 12 जून
तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे : 13 जून
गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे : 13 ते 15 जून
अंतिम गुणवत्ता यादी तयार करणे : 15 जून
अंतिम गुणवत्ता यादीचा डेटा प्रोसेसिंग : 16 ते 18 जून
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : 19 जून
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे : 19 ते 22 जून
दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : 23 जून

हेही वाचा

SCROLL FOR NEXT