Teacher Service Termination Pudhari
पुणे

Pashchim Maharashtra Education Trust Teachers: ‘सेवासमाप्त कर्मचारी’ म्हणणे चुकीचे; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील शिक्षकांचा दावा

सेवा समाप्तीचा अधिकृत आदेशच मिळालेला नाही; चेंज रिपोर्टप्रकरणी उच्च न्यायालयात खटला सुरू असल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मला किंवा माझ्या बहिणीला सेवा समाप्तीचा कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. मी, माझी बहीण तसेच संबंधित इतर कर्मचारी आजही सेवेत रुजू आहोत. आम्ही आमची कर्तव्ये बजावत आहोत तसेच आम्ही सेवेत कार्यरत असल्याने आमचे वेतन बंद करणे हा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून आमचे वेतन शासनाकडून बंद करण्यात आलेले नाही.

त्यामुळे आम्हाला ‘सेवा समाप्त केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी’ म्हणून संबोधणे पूर्णपणे चुकीचे, दिशाभूल करणारे व वस्तुस्थितीविरुद्ध आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या शाळांमधील तबस्सूम अन्वर शेख, नाजेमा सोहेल खान यांच्यासह अन्य शिक्षकांनी दिली आहे.

संबंधित शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची सेवा अधिकृतपणे समाप्त झालेली नसताना आमचा उल्लेख सेवासमाप्त कर्मचारी असा केल्यामुळे आमची अनेक वर्षांची शैक्षणिक सेवा, सामाजिक प्रतिष्ठा व व्यावसायिक प्रतिमा यांना गंभीर धक्का पोहोचला आहे. संस्थेचे अध्यक्ष समजत असलेल्या जुबेर रशीद खान यांनी करून घेतलेल्या चेंज रिपोर्टवर सध्या वाद सुरू आहे. संबंधित प्रकरणाचा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. अद्याप त्यासंदर्भात कोणताही निकाल लागला नाही.

आमचा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक आकस नाही. मात्र, माझ्या वडिलांनी सन १९८६ मध्ये स्थापन केलेल्या पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचा फर्जीवाडा करून ताबा घेणे, बोगस कागदपत्रांचा वापर करणे, संस्थेची मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करणे आणि त्यास विरोध करणाऱ्या आम्हा बहिणींना संस्थेच्या कामकाजापासून दूर करण्यासाठी षडयंत्र रचणे, हा प्रकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. जुबेर रशीद खान यांच्या कथित मनमानी, बेकायदेशीर व गैरप्रकारांविरुद्ध आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत आणि पुढेही देत राहू, असे देखील संबंधित कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्हाला सेवा समाप्त कर्मचारी संबोधणे चुकीचे

माझी, माझ्या बहिणीची तसेच इतर कर्मचाऱ्यांची सेवा अधिकृतरीत्या समाप्त झालेली नसताना आम्हाला सेवासमाप्त कर्मचारी असे संबोधण्यात आले असून, ती माहिती तत्काळ दुरुस्त करावी. संस्थेच्या चेंज रिपोर्ट, बोगस कागदपत्रे, फर्जीवाडा, सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या सही-शिक्क्यांचा गैरवापर खान यांनी केला असून, त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT