बाणेर: पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरुवारी (दि.17) पुणे शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे विभागाने जाहीर केले होते. मात्र जलवाहिन्यांच्या देखभाल, दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे शुक्रवारीही या भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.
पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा कामाचा अंदाज येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवूनही जलवाहिन्यांच्या देखभाल, दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने अनेक वेळा शुक्रवारी पाणी येत नाही किंवा कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी येते. (Latest Pune News)
त्यामुळे कामासाठी नेमका किती कालावधी लागणार याचे नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची चूक होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना शुक्रवारी पुन्हा त्याचा प्रत्यय आला. परिसरातील चाळी आणि वस्त्यांमध्ये टँकरही जाऊ शकत नसल्याने रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू असल्याचे चित्र दिसून आले. घरांमध्ये पिण्याचे शिल्लक नसल्याने नागरिकांना प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी संपर्क साधला असता काहींशी संपर्क झाला नाही. तर काही अधिकार्यांना काम कधी पूर्ण होईल हे सांगता आले नाही. तर काहींनी शुक्रवारी काम पूर्ण होणे अवघड असून, शनिवारी (दि.18) पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले.