Ward 27 corporator Lata Gowda Pudhari
पुणे

Parvati Navipeth Ward 27 corporator Lata Gowda: शिक्षण व महिला सबलीकरणाला प्राधान्य – लता गौडा यांचा संकल्प

भाजपच्या नगरसेविका लता गौडा यांचा निर्धार; मूलभूत सुविधांसह शिक्षणातील गळती रोखण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रभागातील रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज या समस्या सतत समोर येत असतात. त्यावर सातत्याने कामेही सुरू असतात. मात्र, शिक्षणातील गळती आणि महिलांच्या सबलीकरणाचे मुद्दे दुर्लक्षित राहतात. आपल्या कार्यकाळात पर्वती दर्शन परिसरातील हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर माझा भर राहणार आहे, असा संकल्प प्रभाग 27 नवी पेठ - पर्वती प्रभागातील ‌‘क‌’ गटातून निवडून आलेल्या लता गौडा यांनी केला आहे. पती रघुनाथ गौडा (अण्णा) यांनी गेल्या 25 वर्षांत केलेल्या सामाजिक कामांमुळेच मी नगरसेविका होऊ शकले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

लता गौडा ह्या भाजपच्या तिकिटावर भाग 27 पर्वती-नवी पेठ प्रभागातील ‌‘क‌’ गटातून भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. दै. ‌‘पुढारी‌’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, माझे माहेर उडपीचे. आई अत्यंत साधी, दयाळू आणि लोकांना मदत करणारी. अडलेल्या, नडलेल्यांना तिला मदत करताना पहिल्याने माझ्यावर तिचे नकळत संस्कार झाले. त्यानंतर आम्ही बारामतीजवळील निरा येथे व्यवसायानिमित्ताने आलो. तेथे वडिलांचे हॉटेल होते. मी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका घेतल्यानंतर ाझे लग्न जुळले.

रघुनाथअण्णा यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. मुलगा व्यावसायिक आहे. स्वत:चा फ्लॅट आहे, इतकीच माहिती होती. वडिलांनी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते सतत चौकात बसलेले दिसायचे. लग्नापूर्वीच मला हे वडिलांनी सांगितले होते. लग्न झाल्यावरही वर्षभर नवरा काय करतो, हे मला समजले नव्हते. मी ग््राामीण भागातून पुण्याच्या पर्वती दर्शन या भागात आले. हा संपूर्ण भाग झोपडपट्टीचा असल्याने ते जीवन जवळून पाहू लागले. या परिसरात त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. त्यामुळे रिक्षावाला, खाद्यपदार्थ विक्रेते हे माझ्याकडून पैसे घेत नव्हते. ते नमस्कार करून म्हणायचे, अण्णांच्या पत्नी आहात आपण. पैसे नको. तेव्हा मी घाबरले. घरच्यांनाही हा किस्सा सांगितला. मला त्या वेळी ‌‘वास्तव‌’ सिनेमातील संजय दत्तच्या व्यक्तिरेखेची आठवण झाली.

नवरा नेमका काय करतो, हे कळत नव्हते. मात्र, हळूहळू समजले की, या परिसरात त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे. अनेकांच्या मदतीला वेळी-अवेळी धावून जाणे, प्रसंगी रक्तदानही करणे, गरजवंतांना पदरमोड करून शिधा पुरविणे, असे अनेक प्रकारचे मदतकार्य त्यांच्याकडून सुरू होते. माझ्याकडून रिक्षाभाड्याचे पैसे न घेणारा चालक मला नंतर भेटला. त्या वेळी पैसे न घेण्याचे कारण त्याने सांगितले. तो म्हणाला, अहो वाहिनी, मी घरात नसताना रात्रीच्या वेळी माझ्या आईला ज्याने दवाखान्यात ॲडमिट केले, तिच्यासाठी रक्त दिले, अशा माणसाकडून मी पैसे कसे घेऊ? त्याच्या या उत्तराने अण्णांचे मोठेपण मला प्रकर्षाने जाणवले व मला त्यांचा अभिमान वाटू लागला.

बजेटची वाट न पाहता स्वच्छतागृहांची स्वच्छता

शिक्षण मंडळात काम करताना त्यांनी प्रभागातील मुलांना शिक्षणाकडे वळविले. त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर केले. त्यांच्यासाठी मोफत अभ्यासिका सुरू केल्या. प्रभागतील सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना शासकीय योजनांची मदत देखील मिळवून दिली. त्यामुळेच सर्वधर्मीयांकडून प्रतिसाद मिळाला. प्रभागातील स्वच्छतागृहांची स्वच्छता आम्ही कोणत्याही बजेटची वाट न पाहता सुरू केली आहे आणि भविष्यातही या परिसरातील रहिवाशांना चांगले स्वच्छतागृह उपलब्ध राहतील, हा आमचा प्रयत्न राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT