कोरेगाव भीमा: हवेली व शिरूर तालुक्यांना जोडणारा भीमा नदीवरील पेरणे- कोरेगाव येथील भीमा नदीमधील बांधार्याचा पेरणे गावाकडील बराचसा कडेचा भाग शुक्रवारी( दि.20) प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने शासनाचे व शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसाळा सुरुवातीला या बंधार्याचे लोखंडे ढापे काढण्यात येतात, परंतु या वेळी बंधार्याची ढापे जास्त पाऊस असून देखील काढण्यात आली नसल्याने नदीचे प्रवाहाचे पाण्याचा फुगवटा साचून हा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पाण्याच्या अतिदाबामुळे पेरणे गावच्या बाजूकडील बंधारा फुटून वाहून गेला. (Latest Pune News)
जलसंपदा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित बंधार्याचे बांधकाम वाहून गेल्याने नुकसान झाले असून, या बंधार्यावरून लोक कोरेगाव भीमा - पेरणे या भागात ये- जा करतात, परंतु सुदैवाने येथे जीवितहानी टळली. शेतकर्यांच्या नुकसानीस जलसंपदा खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत.
या खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे ही स्थिती उदभवली असून, जलसंपदा खात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पेरणे गावचे माजी सरपंच नीलेश वाळके यांनी दिला आहे. जलसंपदाचे शाखा अधिकारी राजाराम आहेर, देखभाल कर्मचारी संजय थिटे, कालवा निरीक्षक आशा डाके यांनी येऊन वाहून गेलेल्या बंधार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रसंगी पेरणे गावचे माजी सरपंच नीलेश वाळके, अनिकेत वाळके, संतोष वाळके, नितीन मल्हाव, भानुदास मल्हाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या बंधार्याचा काही भाग वाहून गेल्याने नदीचे पात्र उथळ झाल्याने निश्चितच पाण्याचा साठा कमी होणार आहे. नदीकाठाचे मोठे शेती क्षेत्र, या भागातील ओद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा होत असून, बंधारा फुटल्याने पुढील काळात मोठ्या पाण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, अशी माहिती पेरणे गावचे माजी सरपंच नीलेश वाळके यांनी दिली.
चौकीदार नेमावा : ग्रामस्थांची मागणी
महत्त्वाचा बंधारा असूनही सद्य:स्थितीत येथे चौकीदार नसल्याने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे याची देखभाल करण्यासाठी कायमचा चौकीदार नेमावा, अशी मागणी पेरणे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच नीलेश वाळके, शेतकरी अनिकेत वाळके यांनी केली आहे.
उन्हाळ्याचे शेवटचे आवर्तन संपल्यानंतर सतत पाऊस चालू झाला, 7 जूनपर्यंत लोखंडी ढापे काढण्याचे नियोजन असते. बंधार्याची रुंदी कमी असल्याने आपल्याला मशीन नेता येत नाही. ढापे काढायला वेळच मिळाला नाही. येथे बंधारा विभागाचे कर्मचारी कमी असून, चौकीदार नाही. पुढे नेमण्यात येईल. दुरुस्तीचे काम थोडे झाले होते. पाण्यामुळे काम पुढे करता आले नाही.- राजाराम आहेर, शाखा अधिकारी, जलसंपदा खाते