Cattle Pudhari
पुणे

Parinche Embryo Transfer Project: देशी गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण प्रकल्पाने वाढवली दूध उत्पादन क्षमता

सहिवाल, गीर, राठी व डांगी गायींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भ्रूण प्रत्यारोपण; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे/परिंचे: पुणे जिल्ह्यात भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यात प्रतिवेत सुमारे तीन हजार लिटरपेक्षा अधिक दूध देण्याची क्षमता असलेल्या उच्च वंशावळीच्या देशी गायी शेतकऱ्यांच्या बांधावर तयार होणार आहेत. त्यामध्ये सहिवाल, गीर, राठी व महाराष्ट्रातील डांगी व खिल्लार गायींचा समावेश आहे. या उपक्रमामुळे देशी गोवंश संवर्धन, जनुकीय सुधारणा आणि दूध उत्पादनवाढीस मोठी चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे.

दुसऱ्या टप्प्यांतर्गत 16 निवडक गायींमध्ये उच्च जनुकीय क्षमतेच्या सहिवाल जातीचे भ्रूण यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर मोफत देण्यात आली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर राज्यातील देशी गोवंश संवर्धन कार्यक्रमाला नवे बळ मिळाले आहे. देशी गोवंश संवर्धनासाठी मौजे परिंचे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी भ्रूण प्रत्यारोपण (एम्बो ट्रान्सफर) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा गुरुवारी (दि. 26) यशस्वीरीत्या प्रारंभ झाला. या कराराच्या अंमलबजावणीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून हा उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

राज्याच्या देशी गाय संवर्धन विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत असून, दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे हा प्रकल्प डॉ. शीतलकुमार मुकणे आणि प्रकल्प समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांचे सातत्यपूर्ण वैज्ञानिक मार्गदर्शनामुळे प्रकल्पाची तांत्रिक अंमलबजावणी अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व भ्रूण प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विष्णू जवने यांच्या मार्गदर्शनाखालील तज्ज्ञ पथकाने गुरुवारी मौजे परिंचे गावात प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यावेळी पुरंदर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. अस्मिता सताळकर व डॉ. अर्चना जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी रविराज ताकवले आदी उपस्थित होते. परिंचे येथील पशुपालक अरविंद गेनबा गुळंबे, हिंमतराव गोविंदराव जाधव, रामचंद्र माधवराव सूर्यवंशी तसेच हरगुडे येथील सुशील बाळकृष्ण ताकवले, सचिन कोंडीबा ताकवले, भूषण रवींद्र ताकवले, संतोष दत्तात्रय ताकवले, किशोर मुकुंद यादव व सूर्यकांत मालोजीराव ताकवले यांच्या गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले.

देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, परिंचे येथे राबविण्यात येणाऱ्या या संयुक्त उपक्रमामुळे महाराष्ट्रात देशी गोवंश संवर्धन, जनुकीय सुधारणा व दूध उत्पादनवाढीस मोठी चालना मिळणार आहे. तसेच ग््राामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT