पुणे

पारगाव ते चौफुला रस्ता प्रवास धोकादायक

अमृता चौगुले

केडगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पारगाव-चौफुला रस्त्याच्या कामाने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की हा रस्ता चौपदरीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे. गेली अनेक वर्षे हा विषय चर्चेत होता. मागील सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले;

मात्र ते काम नक्की कसे सुरू आहे, हे सांगणे अवघड आहे. येथे शासनाने कामाचा माहितीफलक लावलेला नाही. त्यामुळे नक्की कोण हे काम करतेय, कोणता कंत्राटदार काम करतोय, याची माहिती होत नाही. कामाची सुरुवात कधी झाली आणि ते कधीपर्यंत पूर्ण करायचे आहे, काम नक्की कसे आहे, रस्ता डांबरी की काँक्रीटमध्ये केला जाणार, त्याची नक्की रुंदी किती असून, तो कोणत्या बाजूला किती होणार, याची काहीही माहिती अद्यापपर्यंत कोणालाच नाही.

सध्या काम करीत असलेल्या कंत्राटदाराने हा रस्ता उखडून टाकला आहे. लहान-लहान खड्ड्यांनी खाली-वर झालेला हा रस्ता ओबडधोबड आणि त्रासदायक बनवला आहे. त्यात काही छोटे पूल बनवून ते अर्धवट ठेवले आहेत. रस्त्याने जाणार्‍या वाहनांना आणि त्याच्या मागे-पुढे जाणार्‍या दुचाकींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. बांधलेले पूल अर्धवट आहेत, तर रस्त्याच्या मध्यभागी काही ठिकाणी लोखंडी गज बाहेर आले आहेत.

चुकून त्यात एखादा दुचाकीस्वार पडल्यास होणार्‍या अपघाताला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. हा रस्ता साधारण 12 किलोमीटरचा असून, त्यात जवळपास 10 पेक्षा अधिक पुलांची कामे झाली असून, ती अर्धवट आहेत. परिणामी, रस्त्यापेक्षा पुलांचा मोठा धोका वाहनांना निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडाफार पाऊस झाला की, या रस्त्यावर चिखल होतो. पाऊस नसल्यास सर्वत्र धूळ पसरते. अशा खडतर रस्त्याने प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT