child Aadhaar card process
पुणे: मोबाईलद्वारे आधार कार्ड तयार करण्यास मनाई करण्यात आल्याने पाच वर्षे वयाखालील मुलांच्या पालकांना बाल आधार कार्डासाठी पोस्टाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. पोस्टातही दररोज मर्यादित संख्येलाच सेवा पुरविण्यात येत असल्याने आधारसाठी पालकांची अक्षरशः दमछाक होत आहे.
मोबाईल नंबर व पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी त्याचप्रमाणे पाच वर्षे वयाखालील बालकांचे नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी पोस्टातील काही कर्मचार्यांच्या मोबाईलवरच तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे विविध संस्थांच्या पुढाकाराने आयोजित आधार सुविधा शिबिरांमध्ये अशी आधार विनाविलंब करून दिली जात होती. (Latest Pune News)
तथापि, मोबाईलवरील अॅपद्वारे आता केवळ मोबाईल क्रमांक व पॅन क्रमांक लिंक करण्याचेच काम मोबाईलद्वारे केले जावे, अशा सूचना दिल्याने शिबिरांमधून बाल आधार कार्ड तयार करून देण्याचे काम बंद करावे लागले आहे, असे हे काम करणार्या एका टपाल कर्माचार्याने दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
परिणामी, पालकांना बाल आधार कार्डसाठी टपाल कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. शहरातील काही मोजक्या टपाल कार्यालयात आधार सुविधा केंद्राचे काम चालते. मात्र, तेथेही दररोज ठरावीक नागरिकांनाच टोकन देऊन केवळ त्यांनाच ही सेवा पुरविण्यात येत असल्याने पालकांना वारंवार टपाल कार्यालयात जावे लागत आहे.
यासाठी टोकनची संख्या वाढविण्याबरोबरच मोबाईलद्वारे बाल आधार कार्ड तयार करण्याची सुविधा पूर्ववत सुरू करावी, अशी सूचना आधार कार्ड सेवासुविधा शिबिरे आयोजित करणार्या घोरपडे पेठेतील पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश कल्याणकर यांनी केली आहे.
जन्मदाखल्यातील नावाचे बदल ठरताहेत अपार आयडीत अडथळे
अल्पवयीन मुलांच्या नावात नंतर केले जाणारे बदल हे आधार कार्ड तयार करण्यात मोठा अडथळा ठरत आहे. बालकांच्या जन्मानंतर त्याचे घरगुती पद्धतीने नामकरण केले जाते व त्यानुसार त्याचा जन्मतारखेचा दाखला तयार करून घेतला जातो. त्यानंतर शाळेत दाखल करतेवेळी अनेक पालक मुलाचे नाव बदलतात.
अशा वेळी जन्मदाखल्यातही सुधारणा गरजेची ठरते. परंतु, ती करताना जन्मतारखेत मूळ नावाच्या पुढे ‘ऊर्फ’ असा उल्लेख करून बदललेले नाव लिहिले जाते. आधार कार्ड तयार करणार्या यंत्रणेद्वारे मात्र अशी ‘ऊर्फ’ नावे लिहिलेली कागदपत्रे स्वीकारली जात नसल्याने संबंधित मुलांचे अपार आयडी तयार होण्यात असंख्य अडथळे येत आहेत. या व्यवस्थेत बदल करण्यासाठी शासकीय पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा कल्याणकर यांनी व्यक्त केली.
जन्मदाखल्यातूनमूळ नाव कायद्यानेच वगळता येत नाही. आधार कार्डसाठी जन्म दाखल्यावर एकाच नावाचा उल्लेख करावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु, नाव बदलल्यानंतर बदललेल्या नावाचा उल्लेख जन्म दाखल्यात मूळ नावापुढे ‘ऊर्फ’ असाच करावा लागतो.- अपर्णा बासरकर, अतिरिक्त निबंधक, जन्म-मृत्यूनोंदणी विभाग, पुणे महानगरपालिका