

Jewelry store looted at gunpoint
पुणे: भरदिवसा बंदुकीच्या धाकाने वडगाव बुद्रुक येथील सराफी पेढी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवर तोंडाला मास्क लावून आलेल्या तिघांनी येथील गजानन ज्वेलर्समध्ये घुसून महिलेला मारहाण करत शस्त्राच्या धाकाने पाच सोनसाखळी आणि एक नेकलेस असा पाच तोळे सोन्याचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
दरम्यान, घटनेनंतर पसार झालेले तिघे आरोपी एका चारचाकी गाडीच्या डॅश कॅमेर्यात कैद झाले असून, सिंहगड पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके त्यांच्या मागावर आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात जबरी चोरी, आर्म ऍक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
याबाबत मंगल घाडगे (55, रा. सदाशिव दांगट नगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वडगाव, रेणुका नगरी परिसरात असलेल्या गजानन ज्वेलर्स येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती शंकर यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडले.
काही वेळानंतर फिर्यादीचे पती एका अंगठीची डिलेव्हरी ग्राहकाला देण्यासाठी दुकानाबाहेर पडले. त्यावेळी फिर्यादी या एकट्याच दुकानात होत्या. दरम्यान दीडच्या सुमारास दुचाकीवरून आलेले तिघेजण थेट दुकानात शिरले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. तर त्यांच्याकडे पिस्तूल होते. त्यांनी काउंटरवर बसलेल्या फिर्यादी यांना मारहाण केली.
पिस्तुलाचा धाक दाखवून सोने घेऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी सोन्याच्या चैन आणि एक नेकलेस असे पाच तोळे सोने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वडगाव येथे दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पाच तोळे सोने तिघांनी हिसकावून पळ काढला आहे. आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
- दिलीप दाईंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस ठाणे