वेल्हे : खडकवासला धरण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या जमिनीवरील टपऱ्या, हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस, बंगले आदी अतिक्रमणांवर आठ दिवसांपासून धडक कारवाई होत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पानशेत, वरसगाव धरण परिसरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
पुरेशी यंत्रसामग्री तसेच पोलिस फौजफाटा व मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने पानशेत परिसरातील अतिक्रमण कारवाई सोमवारी (दि. 17) सुरू करण्यात आली नाही, असे वरसगाव धरण शाखेच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, शासनाच्या लेखी आदेशानुसार धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेली तसेच वाहतुकीस अडथळे आणणारी पाटबंधारे विभागाच्या सरकारी मालकीच्या जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमणे काढण्यात येत आहेत.
धरणाच्या मुख्य भिंतीलगतच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या बांधकामांमुळे आणीबाणीच्या प्रसंगी धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांना नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे.
संपादित जमिनीवरील, तसेच पानशेत पाटबंधारे शासकीय कर्मचारी वसाहतीतील निवासी अतिक्रमणांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. याबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
बाजारपेठ पुलावरील मुख्य पानशेत रस्त्यावरील दुकानाचे अतिक्रमण काढताना व्यावसायिक.