वेल्हे : पानशेत-आंबी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. भात, भुईमूग आदी पिके रानडुकरांचे कळप रातोरात जमीनदोस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. (Pune Latest News)
सततच्या पावसामुळे भातरोपांचा तुटवडा निर्माण झाला असतानाही शेतकर्यांनी कशीबशी रोपांची लागवड केली. पानशेत धरणाजवळील आंबी (ता. हवेली), रुळे, कांदवे, वांजळवाडी, कुरण खुर्द, पानशेत (ता. राजगड) व परिसरात मागील 8 ते 10 दिवसांपासून रानडुकरांचे चार ते पाच कळप रातोरात उभी पिके जमीनदोस्त करत आहेत.
सततच्या पावसामुळे वनक्षेत्रासह खासगी जंगलात झाडे-झुडपे तसेच गवत वाढले आहे. त्यामुळे जंगलात बिबट्यांचा वावर वाढला आहे. भात, भुईमूग पिके खाण्यासाठी आलेल्या रानडुकरांवर बिबटे हल्ले करत आहेत. बिबट्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी रानडुकरे भात पिकातून सैरावैरा धावत असतात. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.
आंबी येथील दीपक गणपत निवंगुणे, सोनबा बबन निवंगुणे, सुरेश धोंडिबा निवंगुणे, पोपट रघुनाथ निवंगुणे आदी शेतकर्यांच्या उभ्या भात पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे.