पुणे

‘पंढरीचा वारकरी’ विधानसभेतही वारकरीच राहिले : देवेंद्र फडणवीस

Laxman Dhenge

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : पंढरीचा वारकरी हा कितीही मान, सन्मान मिळाला तरी मानकरी न होता विधानसभेतही वारकरी म्हणूनच पहावयास मिळाला, असे गौरवोद्गार व्यक्त करत दिवंगत आमदार दिगंबर भेगडे यांना आदरांजली वाहत त्यांचे कार्य व जीवनप्रवास आदर्शवत असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. स्व. दिगंबर भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, खा. श्रीरंग बारणे, आ. उमा खापरे, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, भाजप किसान मोर्चाचे गणेश भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, हभप पंकज महाराज गावडे, संतोष महाराज भोसले, निमंत्रक व भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी हभप समाधान महाराज शर्मा यांची कीर्तनसेवा झाली, तसेच स्व. दिगंबर भेगडे यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती पहावयास मिळतात. मोठमोठी पदे मिळत गेली, समाजाकडून सन्मान होत गेला की माणसाची वृती आपोआप बदलते व अहंकार निर्माण होतो; परंतु स्व. दिगंबर भेगडे याला अपवाद ठरले. ते सलग दोन वेळा आमदार झाले. पक्ष संघटनेत मोठ्या पदावर काम केले; परंतु त्यांच्यातील मानसन्मान कधीही अहंकार झाला नाही, तर ते पंढरीचा 'वारकरी' म्हणूनच कायम राहिले.

रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, प्रामाणिक व नि:स्वार्थी काम करणार्‍याला समाजच उचलून धरतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व. दिगंबर भेगडे हे होत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, समाजाच्या हिताची जाण असलेला व अविरतपणे समाजासाठी झटणारा व्यक्ती गेला की, त्याच्या मनातील संकल्पना अपुर्‍या राहतात. त्या अपुर्‍या राहिलेला संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे व त्या पूर्ण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. रवींद्र भेगडे यांनी प्रास्ताविक करताना स्व. दिगंबर दादा यांचा जीवनप्रवास व कार्यपद्धतीचे वर्णन केले, नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले, तर रघुवीर शेलार यांनी आभार मानले.

'दादां'च्या स्वप्नातील कामे पूर्ण करू !

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी याप्रसंगी स्व. दिगंबर भेगडे यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला मिसाईल प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचा मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल व रस्त्याला स्व. दिगंबर दादांचे नाव द्यावे, असे आवाहन केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही स्व. दिगंबर भेगडे यांच्या अपूर्ण राहिलेल्या कल्पना पूर्ण करण्याचे आवाहन केले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसाईल प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न, भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माण तसेच अन्य काही संकल्पना, प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व रवींद्र भेगडे व त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहू, असे आश्वासन दिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT