Pandeshwar Temple Pudhari
पुणे

Pandeshwar Tourism: पांडेश्वरचा ऐतिहासिक-धार्मिक वारसा पर्यटन नकाशाच्या प्रतीक्षेत; विकासासाठी निधीची गरज

बाहुबली महाशिवलिंग, पाच पांडवांचे मंदिर अन् प्राचीन शिल्पकलेचा ठेवा; रस्ते व मूलभूत सुविधांचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

अमृत भांडवलकर

सासवड: पौराणिक आख्यायिका, प्राचीन स्थापत्यकला आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम असलेले पांडेश्वर (ता. पुरंदर) हे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. बाहुबली महाशिवलिंग, नदीकिनारा, भव्य तटबंदी, कोटाई माता मंदिर आणि पाच पांडवांचे मंदिर अशा वैविध्यपूर्ण वारशाने समृद्ध असलेले पांडेश्वर अद्याप पर्यटनाच्या नकाशावर आलेले नाही. ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनासह पर्यटन विकासाला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे.

पांडवांची आख्यायिका

पांडेश्वर येथील प्राचीन शिवालय आणि बाहुबली महाशिवलिंगाभोवती विविध पौराणिक आख्यायिका प्रचलित आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि पाच पांडवांनी बेल व तांदळाच्या साहाय्याने या महाशिवलिंगाची निर्मिती केली, अशी आख्यायिका पुजारी आकाश दळवी यांनी सांगितली. पाच पांडवांनी याच परिसरात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व पितृविधी केल्याचा पौराणिक इतिहासही सांगितला जातो. त्यामुळे आजही पितृशांती, पितृदोष निवारण आदी धार्मिक विधींसाठी भाविक येथे येतात. श्रद्धा आणि परंपरेने जोडलेले हे स्थान परिसरातील धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

तीर्थक्षेत्र विकास निधी

पांडेश्वरला पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे. तीर्थक्षेत्र विकास निधीतून पायाभूत सुविधा उभारल्यास या ऐतिहासिक वारशाला व्यापक ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा रोमणवाडीचे सरपंच पंढरीनाथ सोनवणे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लालाअण्णा जगताप यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीर्थक्षेत्र विकासासाठी मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिल्पकलेला समृद्ध वारसा लाभलेले पांडेश्वर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने या ठिकाणाचा शास्त्रीय अभ्यास, वारसा संवर्धन आणि पर्यटन विकास यांचा समन्वय साधल्यास पुरंदरच्या पर्यटन नकाशावर पांडेश्वरला मानाचे स्थान मिळू शकते.

शिल्पकलेचा दुर्मीळ ठेवा

पांडेश्वरचे वैशिष्ट्य केवळ धार्मिक महत्त्वापुरते मर्यादित नाही. मंदिराची रचना, प्रवेशद्वार, दगडी बांधकाम आणि परिसरातील शिल्पकलेत प्राचीन मंदिर स्थापत्याचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने पाहायला मिळतात. मंदिराच्या त्रिमितीय रचनेतील बारकावे, शिल्पवैशिष्ट्ये आणि वास्तुरचनेमागील शास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास झाल्यास या वारशाचे आणखी एक महत्त्वपूर्ण रूप समोर येऊ शकते.

समृद्ध वारसा; मात्र सुविधांचा अभाव

पुणे-पंढरपूर मार्गावरील जेजुरी-मोरगाव मार्गावरून पांडेश्वरकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे या ऐतिहासिक स्थळापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे. परिसराचा नियोजनबद्ध विकास केल्यास धार्मिक पर्यटनासोबतच ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT