वेल्हे: राजगड आणि हवेली तालुक्यात भात पिकावर करपा तसेच तुडतुडे यांसारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून शेकडो हेक्टर क्षेत्रातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. या एकमेव उत्पन्नाच्या साधनावर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
राजगड तालुक्यातील पानशेत धरण परिसरात परिस्थिती गंभीर आहे. शिरकोली येथील शेतकरी भीमराव, शिवाजी, रामभाऊ पडवळ यांची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. ’संपूर्ण वर्षभराचे कष्ट मातीमोल झाले असून आता कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे,’ असे शेतकरी रामभाऊ पडवळ यांनी सांगितले. घोडशेत, ठाणगाव, माणगाव, पोळे, टेकपोळे येथेही अशीच स्थिती आहे. (Latest Pune News)
प्रशासनावर शेतकऱ्यांचा रोष
बारामती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करताना सांगितले की, ’सिंहगड-पानशेतच्या डोंगरी भागात कृषी व महसूल विभाग फिरकतच नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असूनही प्रशासन हातावर हात धरून बसले आहे.
नुकसानीचे क्षेत्र
राजगड तालुका : दीड हजार हेक्टर भातशेती करपा रोगाने बाधित.
हवेली तालुका : 3200 हेक्टर लागवडीतून सिंहगड-पश्चिम भागातील 50-100 एकर पिके वाया.
सिंहगड-पश्चिम हवेलीतील पिकांचेही नुकसान
सिंहगड पायथ्यावरील रहाटवडे, खामगाव मावळ, मोगरवाडी, वरदाडे, वसवेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. हिरवाईने नटलेली भातशेती एका आठवड्यात करपा रोगाने ओसाड झाली आहे. चंद्रकांत दारवटकर, लक्ष्मण दारवटकर, अविनाश मिंडे, रामदास गांडले, प्रमोद भोसले, बाबू होले, प्रशांत भोसले, किसन दुधाणे, विनोद लोहकरे, उमेश थोपटे, धोंडिबा वालगुडे, माधू थोपटे, रमेश निडाळकर, जयराम दारवटकर यांच्यासह शंभराहून अधिक शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
करपा हा बुरशीजन्य रोग असून, तो अतिशय वेगाने पसरतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने बुरशीनाशकांची फवारणी करावी. दरम्यान, हवेली तालुका कृषी अधिकारी अमित रणवरे यांनी सांगितले की, ’शेतकऱ्यांनी रोगाने बाधित पिकांचे फोटो काढून सादर करावेत. कृषी अधिकारी व सहाय्यकांना पाहणीचे आदेश दिले आहेत.- विश्वजित सरकाळे, उपकृषी अधिकारी, सिंहगड विभाग