Municipal Conflict Pudhari
पुणे

Municipal Conflict: महापौर-स्थायी समिती अध्यक्ष आमने-सामने

राजीनामा देईन, पण बेकायदा ओव्हरहेड केबलवरील कारवाई थांबविणार नाही: भिमाले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या ओव्हरहेड केबल कारवाईवरून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेच आमने-सामने आले आहेत. केबलचालकांच्या विनंतीवरून महापौर मंजूषा नागपुरे यांनी कारवाई थांबविण्याची भूमिका घेतली असतानाच स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मात्र, ‌‘वेळेप्रसंगी राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही,‌’ असा पवित्रा घेतला. त्यामुळे अखेर महापौरांनी याप्रकरणी मवाळ भूमिका घेतली.

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी शहरातील ओव्हरहेड केबलवर कारवाई करण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांच्या आग्रही भूमिकेमुळे ही कारवाई सुरू झाली आहे. मात्र, या कारवाईत शहरातील छोट्या केबल व्यावसायिकांच्या केबलवर कारवाई होत असल्याने केबल व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व केबल व्यावसायिकांनी एकत्र येत सोमवारी महापौर नागपुरे यांची भेट घेतली.

या वेळी महापौरांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीतच विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांना ओव्हरहेड केबलबाबत कोणतेही धोरण न करताच कारवाई कशी सुरू केली, अशी विचारणा केली. तसेच तुमच्या कारवाईमुळे नागरिक मला कॉल करून आमचे केबल कनेक्शन बंद झाल्याच्या तक्रारी करीत असल्याचे सांगितले.

त्यावर शेकटकर यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यावर महापौरांनी थेट स्थायी समिती अध्यक्षांना विचारणा केली. तसेच यासंबधीचे धोरण होईपर्यंत कारवाई थांबवली पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यानंतर महापौरांच्या दालनात आलेल्या स्थायी अध्यक्ष भिमाले यांनी मात्र कारवाई थांबविण्यास नकार दिला. वेळप्रसंगी मी राजीनामा देईल. मी सगळ्यांना विश्वासात घेऊन उत्पन्नवाढीसाठी ही कारवाईची मोहीम राबविली आहे, त्यामुळे ती आता थांबविता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

अखेर महापौरांनी मात्र मवाळ भूमिका घेतली. अखेर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांनी केबलचालकांच्या शिष्टमंडळासमोर आम्ही छोट्या केबल वाहिन्यांच्या केबलवर कारवाई करणार नाही. मात्र, एका महिन्यात तुम्ही त्या कशा नियमित करणार यासंबंधीचा आराखडा सादर करा, असे निर्देश दिले. त्यामुळे अखेर या वादावर पडदा पडला.

‌‘...तर उद्यापासून केबल्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करू‌’

शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्स टाकणाऱ्या कंपन्यांविरोधात उद्यापासून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. विविध कंपन्यांनी केबल्स अनियमितपणे टाकल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या विद्युत, अतिक्रमण आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त कारवाईत सोमवारी फरासखाना, बेलबाग आणि बुधवार पेठ परिसरात अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या. यानंतर बोलताना भिमाले म्हणाले, की नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात शहरात सुमारे 3,600 कि.मी. केबल्स अनधिकृत असल्याचे आढळले आहे. दरम्यान, 1 एप्रिलपासून सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत 100 कि.मी. केबल्स हटविण्यात आल्या असून, पुढील महिन्यात 3,000 कि.मी. केबल्स हटविण्याचे उद्दिष्ट आहे.

नियमांनुसार भूमिगत केबल टाकणे बंधनकारक असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर आणि इमारतींवर केबल्सचे जाळे निर्माण केले आहे. या केबल्समुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, विशेषतः गायरोपमध्ये असलेल्या ॲल्युमिनियम तारा विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढवतात. कारवाईनंतरही पुन्हा केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर उद्यापासून कठोर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही भिमाले यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT