श्री कपर्दिकेश्वरचरणी शिवभक्तांचा महापूर; सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक नतमस्तक  Pudhari
पुणे

Kapardikeshwar Temple: श्री कपर्दिकेश्वरचरणी शिवभक्तांचा महापूर; सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक नतमस्तक

शिवभक्तांनी अलोट गर्दी

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंग व त्यावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या तीन कलात्मक पिंडींचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी अलोट गर्दी केली. सुमारे दोन लाख शिवभक्तांनी हजेरी लावल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.

सोमवारी (दि. 11) पहाटे दानशूर व्यक्तिमत्त्व उद्योजक श्री. व सौ. रमेश डुंबरे, श्री. व सौ. किशोर होनराव या उभयतांच्या हस्ते महापूजा, महाआरती करण्यात येऊन सकाळी 6 वाजता मंदिर गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष अनिल तांबे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष डुंबरे, जालिंदर गाढवे, योगेश डुंबरे, प्रसाद डुंबरे, विश्वास डुंबरे, पांडुरंग ताजने आणि रांगेत असंख्य भाविक उपस्थित होते. (Latest Pune News)

श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वर मंदिरासमोरच असलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. येथेही भाविकांनी यानिमित्त रांगेत दर्शन घेतले. भाविकांना संस्थेच्या वतीने दिवसभर खिचडी प्रसाद, फराळाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी ’हर हर महादेव’च्या गजरात स्वयंभू शिवलिंग व त्यावर उभारलेल्या तांदळाच्या तीन पिंडींचे दर्शन घेतले. पहाटे सुरू झालेली दर्शनबारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

यात्रेत बेल, हार, फुले, प्रसाद, पेढे, मिठाईची दुकाने थाटण्यात आली होती. विविध प्रकारची खेळणी, अवाढव्य आकाश पाळणे व विविध खेळण्यांचा आणि खरेदीचा लाभ यात्रेकरूंनी घेतला. भाविकांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिवसभर आरोग्यसेवा पुरविण्यात आली.

नारायणगाव आगाराच्या वतीने जादा एसटी बसगाड्यांची सुविधा करण्यात आली होती. ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी पोलिस नागरिक मित्र संघटनेचे स्वयंसेवक आणि पोलिस कर्मचार्‍यांचा तगडा फौजफाटा सुरक्षिततेसाठी तैनात ठेवला होता.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बसस्थानक, पार्किंग, दर्शनबारी, गावातील रहदारी व गर्दीच्या सर्व ठिकाणी पोलिस पथके नेमली होती. दरम्यान, भव्य अशा श्री कपर्दिकेश्वर मंदिरावर केलेल्या नेत्रदीपक विद्युतरोषणाईने परिसर उजळून निघाला. शिवभक्तांच्या ‘हर हर महादेव’च्या गजराने अवघा परिसर दणाणून गेला होता.

कुस्ती आखाड्यात दूरवरून आले मल्ल

दुपारी दोन वाजता स्व. आमदार श्रीकृष्ण तांबे स्टेडियममध्ये कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, पारनेर, अकोले, खेड, संभाजीनगर, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील मल्लांनी आखाड्यात हजेरी लावली. देवधर्म संस्थेच्या वतीने विजेत्या मल्लांना लाखो रुपयांचे रोख स्वरूपातील इनाम वितरित करण्यात आले. सुमारे 25 हजार कुस्तीरसिकांना दूरवरून आलेल्या मल्लांनी नेत्रदीपक कुस्तीचे डावपेच दाखविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT