पुणे

पुणे : ससूनमध्ये एका वर्षात हजारांहून अधिक प्लास्टिक सर्जरी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अपघातात झालेल्या जखमा, भाजल्याच्या घटना घडल्याने जळलेली त्वचा, जन्मजात बाह्यदोष, कर्करोगाच्या उपचारांनंतर झालेले बदल अशा विविध कारणांसाठी प्लास्टिक सर्जरी केल्या जातात. ससून सर्वोपचार रुग्णालयात वर्षभरात 1000 ते 1200 शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय, कॉस्मेटिक सर्जरीही केल्या जातात. दरवर्षी 15 जुलै रोजी प्लास्टिक सर्जरी दिवस साजरा केला जातो. असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन ऑफ इंडियातर्फे 2011 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जरीच्या जागतिक परिषदेमध्ये हा दिवस जागतिक प्लास्टिक सर्जरी डे म्हणून साजरा करण्यास 2021 मध्ये मान्यता मिळाली.

केवळ बाह्यरूप बदलण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते, असा समज सर्वदूर पसरलेला दिसतो. प्रत्यक्षात चेहर्‍याचे व्यंग, हाताच्या शस्त्रक्रिया, पेरिफेरल नर्व्ह सर्जरी, भाजलेल्या रुग्णांना बरे करणे, मार लागल्यानंतरची पुनर्बांधणी, रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया, कर्करोगानंतर अवयवांची पुनर्रचना अशा विविध प्रकारांसाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते, अशी माहिती ससूनमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. निखिल पानसे यांनी दिली. प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी सारख्या नसतात. प्लास्टिक सर्जरी केवळ बाह्यरूप बदलण्यासाठी केली जात नाही. जखमा भरणे, पुनर्रचना, भाजलेले अवयव पूर्ववत करणे आदींसाठी
प्लास्टिक सर्जरी केली जाते. कॉस्मेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा एक छोटा भाग आहे. प्लास्टिक सर्जरी खूप महागडी असून, केवळ श्रीमंत लोकच करू शकतात, यात तथ्य नाही. सामान्य माणूसही शस्त्रक्रिया करून घेऊ शकतो.

प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो, शस्त्रक्रियेनंतर टाक्यांचे किंवा जखमांचे डाग राहत नाहीत, असे अनेक गैरसमज सामान्य लोकांमध्ये आहेत. प्लास्टिक सर्जन शरीरातील ऊतींवरील प्रक्रिया सफाईदारपणे, बारकाईने आणि कौशल्याने करतात. त्यामुळे जखमांची, टाक्यांची खूण नगण्य असते. नखांपासून केसांपर्यंत कोणत्याही अवयवांसाठी प्लास्टिक सर्जरीचे तंत्र वापरता येते. अपघात, कर्करोग, भाजल्याच्या घटना यामध्ये सर्जरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. विभागप्रमुख डॉ. पराग सहस्रबुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ससूनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सर्जरी केल्या जातात.
         – डॉ. निखिल पानसे, सहयोगी प्राध्यापक, ससून सर्वोपचार रुग्णालय. 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT