पुणे: युडायस पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा आढावा घेतल्यानंतर पाच ते सात वयोगटातील 38 लाख 92 हजार 232 आणि 15 ते 17 वयोगटातील 23 लाख 77 हजार 768 अशा 62 लाख 70 हजार विद्यार्थ्यांचे मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट अर्थात एमबीयूसंदर्भातील काम रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित काम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत एमबीयूचे काम पूर्ण करण्याचे शिक्षकांसमोर मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार, सर्व शाळांनी युडायस प्लस या पोर्टलवरून शाळेतील एमबीयू प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी तयार करून ठेवावी तसेच प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राधान्याने कामकाज पूर्ण करून घ्यावयाचे आहे. काम संपल्यानंतर कॅम्पच्या शेवटी शाळेतील आधार व्हॅलिडेशन आणि मिसमॅचबाबतचे काम पूर्ण करून घ्यायचे आहे.
भारतीय पोस्ट आधार नोंदणी संच उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये प्राधान्याने तालुक्यातील सर्वाधिक प्रलंबित विद्यार्थिसंख्येच्या शाळेत कॅम्पचे आयोजन करणे गरजेचे आहे. तालुकास्तरावरून युडायस प्लस पोर्टलवर लॉगिन करून दैनंदिन माहितीचा आढावा घेण्यात यावा. आवश्यकतेनुसार सर्व शाळा आणि आधार नोंदणी संच ऑपरेटर यांना निर्देश देण्यात यावेत. कामकाज पूर्ण करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
शिक्षण संचालकांनी दिलेले निर्देश
एमबीयू अपडेट करायच्या विद्यार्थ्यांची यादी इयत्तानिहाय तयार करून ठेवावी.
ई-आधार नोंदणी व एमबीयू करण्यासाठी वर्गखोली निवडताना भौतिक सुविधा, इंटरनेट नेटवर्क व पक्का रस्ता आदी सुविधा असलेली वर्गखोली निवडावी आणि सर्व विद्यार्थ्यांना सोयीची जागा निश्चित करण्यात यावी.
पाच व पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
एमबीयूचे काम पूर्णपणे मोफत आहे. सर्व मुख्याध्यापकांनी युडायस प्लस पोर्टलवर वेळोवेळी कॅम्पनंतर माहिती अद्ययावत करावी व त्यानुसार खात्री करावी.
दि. 30 सप्टेंबर 2025 पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी, अद्ययावतीकरण व एमबीयूबाबतचे काम पूर्ण करून युडायस प्लस पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या नावासमोर कॅम्पनंतर लगेच अपडेट करावे.