प्रभागरचनेविरोधात तक्रारींचा आकडा 2500 च्या वर; हरकती दाखल करण्यासाठी आज शेवटची संधी Pudhari
पुणे

Pune Ward Structure Objections: प्रभागरचनेविरोधात तक्रारींचा आकडा 2500 च्या वर; हरकती दाखल करण्यासाठी आज शेवटची संधी

एकाच दिवशी 966 तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर केली असून, या प्रभागरचनेविरोधात तक्रारींचा पाऊस महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे व निवडणूक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहे. मंगळवारी व बुधवारी प्रत्येकी हजार तक्रारी दाखल झाल्या असून, तक्रारींचा आकडा 2500 च्या वर पोहचला आहे. आज गुरुवारी (दि. 4) तक्रार दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, यानंतर या तक्रारींवर सुनावणी घेतली जाणार आहे.

प्रारूप प्रभागरचना जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीला पोषक अशीच ही रचना असल्याचा आरोप शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी केला आहे. (Latest Pune News)

काही प्रभागांमध्ये एकाच पक्षाची प्रभावी मतदारसंख्या विभागून टाकल्याचा आरोप केला आहे. नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांतील प्रभागांचे विभाजन असमतोल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कर्वेनगर, येरवडा, वडगाव शेरी, कात्रज, हडपसर व औंध या भागांबाबत विशेषतः मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदविले गेले आहेत.

आज हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रभागरचनेविरोधात तक्रारी आणखी वाढणार आहेत. यानंतर 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक प्रभागातील हरकती स्वतंत्रपणे ऐकून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा आवश्यक शिफारशी करून अंतिम आराखडा नगरविकास विभागाला सादर करतील. त्यानंतरच अंतिम प्रभागरचना जाहीर होईल आणि सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

एकही हरकत नसलेले प्रभाग पुढीलप्रमाणे :

प्रभाग 10 बावधन : भुसारी कॉलनी, प्रभाग 25 शनिवार पेठ : महात्मा फुले मंडई, प्रभाग 29 डेक्कन जिमखाना : हॅपी कॉलनी, प्रभाग 30 कर्वेनगर : हिंगणे होम कॉलनी, प्रभाग 40 कोंढवा बुद्रुक : येवलेवाडी यांचा समावेश आहे.

सर्वाधिक हरकती विमाननगर-लोहगाव प्रभागात

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक 3 विमाननगर लोहगावमध्ये 707 हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्याखालोखाल प्रभाग 34 नर्‍हे वडगाव बुद्रुकमध्ये 590 आणि प्रभाग 15 मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळीमध्ये 228 हरकती व सूचना आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT