PMC receives 1044 complaints about potholes
पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेने तयार केलेल्या ‘पीएमसी रोडमित्र अॅप’वर आत्तापर्यंत खड्ड्यांच्या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आत्तापर्यंत 1044 तक्रारी अॅपवर आल्या आहेत.
यावर तातडीने कारवाई करीत महापालिकेच्या रस्ते विभागाने 976 खड्डे भरले आहेत. अजूनही ठेकेदारांकडून फक्त ज्या खड्ड्यांबद्दल तक्रार केली आहे तेच भरले जात आहेत. तर शेजारी अथवा रस्त्यावर इतर ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यास कुचराई केली जात आहे. रस्ते विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी देखील ही बाब मान्य करत विभागाच्या सर्व अभियंत्यांना खड्ड्यांभोवती असलेळे इतर खड्डे भरण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Pune News)
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पदपथ आणि रस्त्यांची स्थिती याबद्दल थेट तक्रार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पीएमपी रोडमित्र मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. अलीकडेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या अॅपचे अनावरण केले.
या अॅपद्वारे नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल थेट महापालिकेच्या रस्ते विभागाकडे तक्रार करू शकतात. या अॅपद्वारे नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून तक्रार करू शकतात. तक्रार केल्यानंतर 72 तासांच्या आत खड्डे भरले जातील, असा दावा महापालिका प्रशासनाने केला. जर खड्डे भरले नाहीत तर संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल थेट कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
हे अॅप सुरू केल्यानंतर आतापर्यंत 1044 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 976 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. पहिल्या दिवसापासूनच या अॅपवर तक्रारींचा ओघ सुरूच आहे. या अॅपला नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दररोज खड्ड्यांबद्दल तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर भरपूर खड्डे आहेत.
अॅपद्वारे नागरिक खड्ड्यांबद्दल फोटो काढून तक्रार करतात. रस्ते विभागाच्या संबंधित अधिकार्यांकडून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र, त्या खड्ड्याभोवतीचे खड्डे भरले जात नाहीत. ही बाब उघडकीस आल्यानंतर, मंगळवारी रस्ते विभागाच्या प्रमुखांनी सर्व अभियंत्यांना तक्रारी आलेल्या खड्ड्यांभोवतीचे खड्डे भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अॅप व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेल्या तक्रारींवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावर्षी 13 हजार 45 खड्डे भरल्याचा दावा
महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने 1 एप्रिलपासून आत्तापर्यंत रस्त्यांवरील एकूण 13 हजार 45 खड्डे भरल्याचा दावा केला आहे. या कामासाठी 25 हजार 549 मेट्रिक टन डांबर वापरण्यात आले आहे. याशिवाय आत्तापर्यंत 56 हजार 93 चौरस मीटर रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले आहे. या काळात आत्तापर्यंत 1370 चेंबर दुरुस्त करण्यात आले आहेत, असे रस्ते विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केली.