Onion Pudhari
पुणे

Onion Planting Labor Rates: कांदा लागवडीच्या मजुरीला लगाम; पुरुषांसाठी ८००, महिलांसाठी ७०० रुपये दर निश्चित

बनकर फाटा येथे शेतकरी-मजूर संयुक्त बैठकीत सामंजस्याने निर्णय; खुरपणीसाठी ५०० रुपये रोजंदारी ठरवली

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: कांदा लागवडीच्या मजुरीने ११०० ते १२०० रुपयांचा उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले होते. याबाबत मजुरांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघून हा दर पुरुषांना ८००, महिलांना ७०० रुपये असा मजुरीदर निश्चित करण्यात आला आहे.

या मजुरी दरावर नियंत्रणासाठी शेतकरी, मजूर आणि मजूर वाहतूक करणारे प्रतिनिधी यांची बुधवारी (दि. १८) बनकर फाटा येथे संयुक्त बैठक पार पडली. यात शांततापूर्ण चर्चा होऊन कांदा लागवडीसाठी पुरुष मजुरांना ८००, महिला मजुरांना ७०० रुपये, तर खुरपणीसाठी ५०० रुपये रोजंदारी निश्चित करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलेल्या मजुरी दराच्या प्रश्नावर तूर्तास तोडगा निघाला आहे.

सध्या काही ठिकाणी कांदा लागवडीसाठी १००० ते १२०० रुपये रोजंदारी सुरू असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. आधीच दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारे कवडीमोल बाजारभाव, खत-बियाणे आणि औषधांच्या वाढलेल्या किमती, मशागतीचा खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात मजुरीच्या वाढत्या दरामुळे शेती करायची कशी, असा प्रश्न ओतूर, डिंगोरे, बल्लाळवाडी, उदापूर यांसह परिसरातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर बनकर फाटा येथील बैठकीत दुष्काळी परिस्थिती आणि वाढती महागाई यावर चर्चा झाली. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने मजुरीचे दर निश्चित करण्यात आले. ठरवलेल्या दरानुसार शेतकऱ्यांनी मजुरांना रोजंदारी द्यावी, तसेच मजूर बांधवांनीही या निर्णयाला सहकार्य करावे, असा ठराव करण्यात आला.

या बैठकीस ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे मजुरीच्या संवेदनशील प्रश्नावर शांततेच्या मार्गाने चर्चा होऊन सामंजस्याने निर्णय घेणे शक्य झाले.

शेतकरी-मजूर समन्वय आवश्यक

शेतकरी आणि मजूर हे शेतीव्यवस्थेतील एकमेकांना पूरक घटक आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मजुरीचे दर निश्चित करणे आणि मजुरांच्याही श्रमाचा योग्य सन्मान राखणे, या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. बनकर फाटा येथे झालेला सामंजस्याचा निर्णय हा संघर्षापेक्षा संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

मजुरीबाबत शेतकरी सतर्क

मजुरी दर निश्चित करण्याबाबत झालेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये एकवाक्यता राहावी, यासाठी काही शेतकरी सतर्क झाले आहेत. त्यासाठी गुरुवारी (दि. १९) सकाळी बनकर फाटा येथे शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी निश्चित केलेल्या दरानुसारच मजुरी द्यावी आणि मजूर बांधवांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT