ओतूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ! Pudhari
पुणे

Otur Leopard Attack: ओतूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ!

रात्री नागरिक दहशतीखाली; पाळीव कुत्र्यावर हल्ला, वनविभागाकडून पिंजरा लावण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : ओतूर गावातील वर्दळीच्या देवगल्लीत मंगळवारी (दि. ३०) रात्री ९ वाजता बिबट्याने रस्त्यावर नागरिकांसमोर पाळीव कुत्र्यावर हल्ला करून परिसरात खळबळ उडवून दिली. रवींद्र शिंदे यांच्या मालकीचा ‘पांडू’ नावाचा कुत्रा बिबट्याच्या जबड्यातून थोडक्यात बचावला असला, तरी तो गंभीर जखमी झाला आहे.(Latest Pune News)

देवगल्लीत नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू असताना, श्रीकृष्ण मंदिरामागील पडक्या वाड्यातून एक मोठा बिबट्या रस्त्यावर अवतरला. त्याने थेट पाळीव कुत्र्यावर झडप घातली. घटनेदरम्यान ओट्यावर बसलेले नागरिक, चालते फेरीवाले आणि वाहनचालकांनी आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावले. ‘पांडू’ला वाचवताना त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या काळ्या कुत्र्याने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडक्यात अनर्थ टळला.

या बिबट्याने यापूर्वीही देवगल्लीत आणि आसपासच्या परिसरात कुत्रे व डुकरांची शिकार केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रशांत दांगट यांच्या दोन कुत्र्यांचा फडशा पाडला गेला होता, तसेच बारदारी रस्त्यावर एका डुकरालाही शिकार बनवले गेले आहे. छत्रपती शिवाजी रोडच्या मागील गस्त गल्लीतील सर्व भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडल्यावर बिबट्याने आता देवगल्लीकडे मोर्चा वळविल्याची चर्चा आहे.

या बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे ५२ गल्ली व देवगल्लीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः परिसरात असलेल्या शाळा, अंगणवाडी आणि मुलींच्या शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जो बिबट्या रात्री गावात येतो, तो दिवसा शाळेच्या परिसरात पोहोचू शकतो, ही भीती नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, पांडूवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून, बिबट्याला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे.

अंधाराचा बिबट्याला आधार

देवगल्लीत अनेक वीजखांबांवरील बल्ब खराब असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते. याच अंधाराचा गैरफायदा घेत बिबट्याची हजेरी कायम राहते, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

कडुस (ता. खेड) येथिल अरगडेशिवार येथे बिबट्याचा वावर कँमेरात कैद झाला आहे. परिसरात मंगळवारी (दि. ३०) रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT