ओतूर: नगर-कल्याण महामार्गावर डुंबरवाडी (ता. जुन्नर) हद्दीत शनिवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास डुंबरवाडी गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावरील किगा आईस्क्रीम समोर हा अपघात घडला. आळेफाटा बाजूकडून ओतूरकडे जाणारी यामाहा मोटारसायकल (क्र. एमएच १२एक्सएल १३८०) आणि कल्याणकडून नगरकडे जाणारा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्र एमएच ४६ डीसी २४५१) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील प्रणव नितीन डुंबरे (वय २५, रा. ओतूर, ता. जुन्नर) व गणेश विजय गाडेकर (रा. डिंगोरे, ता. जुन्नर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोघांनाही जीव गमवावा लागला.
दरम्यान, कंटेनर चालक गणेश बाबासाहेब शिंदे (वय ३७, रा. हिवेसिंगा, ता. खोकारमोह, जि. बीड) याने याबाबतची माहिती पोलीसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ओतूर पोलीस पुढील कायदेशीर तपास करीत आहेत.