पुणे : पुढारी वृत्तसेवा : सांगलीमधील उष:काल अभिनव इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे एका 42 वर्षीय पुरुष रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही रुग्णाचे प्राण वाचू शकले नाहीत. पतीच्या निधनाचे दु:ख पचवत पत्नीने पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णाचे यकृत, मुत्रपिंड पुण्याला तर ह्रदय आणि फुप्फुस मुंबईला पाठवण्यात आले. ब—ेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे इतर रुग्णांना जीवदान मिळाले.
सांगली येथे 42 वर्षीय रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आणि मेंदूमध्ये हॅमरेज (ब्रेन हॅमरेज) झाले. रुग्णावर तीन दिवस उपचार सुरू होते आणि शस्त्रक्रियाही पार पडली. मात्र, मेंदूला सूज आल्याने रुग्णाचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णाला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, सोशल वर्कर यांनी कुटुंबाचे समुपदेशन केले. पत्नीने अवयवदानाचा निर्णय घेतला आणि पुढील सूत्रे हलली. ग्रीन कॉरिडॉरच्या सहाय्याने पुणे आणि मुंबईमध्ये अवयव पोहोचवून प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपण झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे झेडटीसीसीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
सांगलीच्या रुग्णालयातील इन्सेंटिव्हिस्ट आणि फिजिशियन डॉ. आनंद मालानी म्हणाले, 'सांगली ते कोल्हापूर रस्त्याने आणि कोल्हापूर ते मुंबई चार्टर्ड प्लेनने अवयव मुंबईला पाठवण्यात आले. तर, कोल्हापूर ते पुणे ग्रीन कॉरिडॉरच्या सहाय्याने किडनी आणि लिव्हर पुण्याला पाठवण्यात आले. मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबाने धाडस दाखवल्याने डॉक्टरांच्या टीमनेही तत्परतेने सर्व प्रक्रिया पार पाडली.'
हेही वाचा