पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गणेशोत्सव काळात राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. मंगळवरी म्हणजेच 26 रोजी ते आणखी तीव्र झाले. त्यामुळे वार्यांचा वेग वाढला आणि जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशभर पाऊस वाढला आहे. (Latest Pune News)
काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांत अतिवृष्टी सुरू आहे. सोबतच, दक्षिण भारतात प्रामुख्याने आंध्र प्रदेशात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हवेचे दाब अनुकूल नसतानाही हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. हा पाऊस 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतरची स्थिती आगामी 24 ते 48 तांसात हवामान विभागाकडून देण्यात येणार आहे.
आंध्रात अतिवृष्टी; अनेक रेल्वेगाड्या रद्द
दरम्यान, आंध्र प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिकंदराबाद ते निजामाबाददरम्यान लोहमार्गावर पाणी येऊन रुळांखालील खडी वाहून गेली आहे. त्यामुळे या राज्यातील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच, अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून, काही रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. अतिवृष्टीमुळे सिकंदराबाद ते निजामाबाददरम्यान रुळांवर पावसाचे पाणी आले. या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की, त्यामुळे रुळांखालील खडी वेगाने वाहून गेली.
परिणामी, लोहमार्गाचा काही भाग कमकुवत झाला. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः रद्द करण्यात आली. काही रेल्वे गाड्यांना पुढे जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने पूर्णा, नांदेड, मुखेड अशा रेल्वेस्थानकांवर त्या थांबून राहिल्या आहेत.
यासंदर्भात सिकंदराबाद येथील रेल्वे अधिकार्यांशी संपर्क साधला असता, बुधवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
असे आहेत अलर्ट (कंसात तारखा)
ऑरेंज अलर्ट (मुसळधार) : पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा (28).
यलो अलर्ट (मध्यम): ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (28, 29), धुळे, जळगाव (28 ते 30), नाशिक, अहिल्यानगर (29), पुणे शहर (29), पुणे घाटमाथा (29 ते 31), कोल्हापूर घाटमाथा (29 ते 31), छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली (28 ते 30), अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ (28 ते 31 ऑगस्ट आणि पुढे 2 सप्टेंबरपर्यंत)