पुणे

कोडीत येथे अफूची शेती : 10 किलोची झाडे जप्त; 2 जण पोलिसांच्या ताब्यात

Laxman Dhenge

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात सासवडच्या पोलिस पथकाने शनिवारी (दि. 24) टाकलेल्या छाप्यात अफूची 10 किलोची झाडे जप्त केली. याप्रकरणी अफूची लागवड करणार्‍या दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई धीरज भानुदास जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. दशरथ सीताराम बडदे व तानाजी निवृत्ती बडदे (दोघेही रा. कोडीत बुद्रुक, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात दोन जणांनी शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळाली.

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आर. डी. गावडे, पोलिस हवालदार एस. डी. घाडगे, व्ही. टी. कांचन, धी. भा. जाधव, वाय. सी. नागरगोजे, ए. ए. भुजबळ, डी. पी. वीरकर, एस. सी. नांगरे, जे. एच. सय्यद, पी. बी. धिवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी तानाजी बडदे यांनी शेतात शेवंतीच्या झाडांना लागूनच अफूची लागवड केल्याचे दिसले. दरम्यान, सासवड पोलिसांनी शेतातून 8 किलो अफूची झाडे जप्त केली. त्यानंतर दशरथ बडदे यांनी कांद्याच्या शेतात अफूची लागवड केल्याचे दिसले. त्यांच्या शेतातून 2 किलो 500 ग्रॅम असलेली ही बोंडे प्रतिकिलो 2 हजार रुपये दराने विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केलेली मिळून आली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT