Pharmacy Pudhari
पुणे

Pune Open School Pharmacy Eligibility: ओपन स्कूलमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना फार्मसी प्रवेशासाठी पात्रता

पीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; डी. फार्म, बी. फार्म व फार्म. डी अभ्यासक्रमांसाठी दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र व राज्य सरकारच्या ओपन स्कूल शिक्षणप्रणालीतून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) घेतला आहे.

या निर्णयामुळे डी. फार्म, बी. फार्म आणि फार्म. डी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीसीआयच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालये तसेच विद्यापीठांना देण्यात आले आहेत.

ओपन स्कूल संस्थांमधून ज्या विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. किंवा जे विद्यार्थी सध्या औषधनिर्माण अभ्यासक्रम शिकत आहेत असे विद्यार्थी फार्मसी अधिनियम 1948 अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणीसाठी पात्र मानण्यात येणार आहेत. परंतु, त्यासाठी अधिनियमातील इतर अटी पूर्ण करणे आवश्यक राहणार असल्याचेही पीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हा आदेश डी. फार्म, बी. फार्म, आणि फार्म. डी अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त संस्थांना, राज्य औषधनिर्माणशास्त्र परिषद, विद्यापीठे व परीक्षा यंत्रणा तसेच सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना लागू राहणार असल्याचेही परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.

ओपन स्कूल शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत प्रवेश व नोंदणीसंदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पीसीआयच्या या स्पष्ट निर्णयामुळे आता प्रवेश प्रक्रिया, शिक्षणाची वैधता आणि व्यावसायिक नोंदणी याबाबतचा संभम दूर होऊ शकतो. तसेच डी. फार्म, बी. फार्म आणि फार्म. डी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने मुक्त शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणाला समकक्षता दिली आहे. त्यामुळे पीसीआयने जर फार्मसी प्रवेशासाठी मुक्त शिक्षणातील विद्यार्थ्यांना संधी दिली असेल, तर तो अतिशय चांगला निर्णय आहे. कारण, या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फार्मसी प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT