Illegal Gambling: खराडीत खुलेआम जुगार; स्थानिक पोलिसांचा काणाडोळा File Photo
पुणे

Illegal Gambling: खराडीत खुलेआम जुगार; स्थानिक पोलिसांचा काणाडोळा

पोलिस उपायुक्त सोमय मुंडेंची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील अवैध धंद्यांबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, असे असताना देखील स्थानिक पोलिसांकडून मात्र याकडे काणाडोळा होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन ठिकाणी मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे आणि गुन्हे शखा युनिट चारच्या पथकाने कारवाई केली आहे. या वेळी पाच जणांना रंगेहाथ पकडले. मात्र, स्थानिक खराडी पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार न येणे गंभीर मानले जाते आहे. स्वतः पोलिस उपायुक्तांना पथक पाठवून कारवाई करावी लागत आहे. (Latest Pune News)

खराडीतील भोलेनाथ मित्रमंडळ चौकाजवळ, खराडकर पार्कमध्ये मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेचार वाजता गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पहिली कारवाई केली. या वेळी येथील सार्वजनिक जागेत मटका जुगार खेळताना आढळलेल्या नवनाथ सुभाष गायकवाड (वय 30, रा. खराडी) व नवनाथ गोरख म्हस्के (वय 52, रा. मुंढवा, केशवनगर) हे दोघे पकडले गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर दोन- अडीच तासाच्या अंतराने याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या विशेष पथकाने खराडकर पार्क परिसरात दुसरी कारवाई केली. यामध्ये विशाल जगदिश तिवारी (वय 30, रा. खराडी), लक्ष्मण एकनाथ अडागळे (वय 45, रा. साईनाथनगर, खराडी) आणि राजेंद्र संभाजी मोरे (वय 54, रा. खराडी) असे तिघे कल्याण मटका नावाच्या जुगाराच्या चिठ्ठ्यांसह व साहित्यासह रंगेहाथ सापडले. जागा मालक महेश रोटे याने जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून त्याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींकडून जुगार साहित्य जप्त केले आहे.

स्थानिक पोलिस अनभिज्ञ कसे?

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, असे असतानादेखील खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटक्याचे धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा किंवा इतर पथकाने कारवाई केली तर त्याला प्रभारी अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे याबाबत आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.

‘त्या’ दोघांना आवरण्याची गरज?

स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करून त्यांची बदली केली होती. मात्र, आता पुन्हा काही ठिकाणी नव्या पद्धतीने वसुली यंत्रणा उभी राहत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नव्याने स्थापन झालेल्या खराडी पोलिस ठाण्यातही अशा दोन जणांची नावे घेतली जात असून, अशा नव्या बहाद्दरांना वेळेत लगाम घालण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याच्या स्टेट्सलाच फोटो

सोमय मुंंडे याच्या पथकाने खराडकर पार्कात केलेल्या कारवाईतील एका आरोपीचे फोटो खराडी पोलिस ठाण्यात वजनदार काम करत असलेल्या पोलिसाच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला असल्याचे दिसून आले आहे.

या आरोपीला संबंधित कर्मचार्‍याने शुभेच्छा दिल्या आहेत. जुगाराच्या अड्ड्याबरोबरच हा आरोपी स्पा सेंटर चालवत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अवैध धंदे चालविणार्‍या एखाद्या व्यक्तीचा फोटो पोलिसच आपल्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेट्सला ठेवत असतील तर नक्कीच ही बाब पोलिस दलाच्या प्रतिमेला शोभणारी नसल्याचे बोलले जात आहे.

डीसीपी मुंडेंच्या कारवाईचा धसका

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त म्हणून सोमय मुंडे यांनी पदभार घेतल्यापासून कारवाईचा धडका लावला आहे. अवैध धंद्येवाल्यांचे त्यांनी कंबरडे मोडले आहे. गावठी दारू, अमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त केला आहे. एकाच दिवशी त्यांनी 42 हातभट्टी दारू विक्रेत्यांना जेलचा रस्ता दाखवला आहे. तर बुधवारी तब्बल 26 सराईतांना जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखविला आहे. अशातच खराडी पोलिसांच्या कारवाई वाट न पाहात त्यांनी आपल्या पथकामार्फत जुगार अड्ड्यावर कारवाई करून प्रभारी अधिकार्‍यांना थेट इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT