पुणे

जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या 48 टक्केच पेरण्या पूर्ण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 11 हजार 94 हेक्टरइतके आहे. त्यापैकी 5 हजार 303 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 48 टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दुष्काळीस्थिती आणि पाण्याची शाश्वत उपलब्धता कमी असल्यामुळे पेरण्यांखालील क्षेत्र घटले आहे. त्यामध्येही मुख्य पीक असलेले उन्हाळी बाजरी, भुईमूग पिकांच्या पेरण्या पन्नास टक्क्यांच्या आतच असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

जिल्ह्यात उन्हाळी बाजरी पिकाखालील सरासरी क्षेत्र 4 हजार 233 हेक्टरइतके आहे. प्रत्यक्षात 1 हजार 648 हेक्टरवर म्हणजे 39 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये एकट्या खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 1 हजार 6 हेक्टर इतकी बाजरीचा पेरा पूर्ण झाला आहे. आंबेगाव 440, शिरूर 63, बारामती व इंदापूर प्रत्येकी 11, जुन्नर 48, मावळ 68 हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे.
उन्हाळी भुईमूग पिकासही शेतकरी दरवर्षी प्राधान्य देतात. मात्र, चालूवर्षी सरासरी 3 हजार 402 हेक्टर क्षेत्रापैकी प्रत्यक्षात 1 हजार 385 हेक्टरवर म्हणजे 41 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे.

त्यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक 459, शिरूर 238, आंबेगाव 230, भोर 215, मावळ 33, जुन्नर 112, बारामती 17, दौंड 33 आणि पुरंदरमध्ये 48 हेक्टरवर भुईमूग लागवड पूर्ण झाल्याचे 6 मार्चअखेरच्या ताज्या अहवालावरून दिसून येते. उन्हाळी पिकांच्या तालुकानिहाय झालेल्या पेरण्या हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : भोर 220, मावळ 102, जुन्नर 160, खेड 2091, आंबेगाव 1018, शिरूर 377, बारामती 247, इंदापूर 972, दौंड 68, पुरंदर 48 हेक्टरवर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर हवेली, मुळशी आणि वेल्हा तालुक्यांतील पिकांच्या पेरण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

जनावरांच्या चार्‍यासाठी मका पेरणीला प्राधान्य

जिल्ह्यातील उन्हाळी पिकांच्या पेरणीला सध्या काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. मात्र, मार्चनंतर पाणी उपलब्धता होणार नसल्याचे लक्षात येता शेतकर्‍यांनी उन्हाळी पिकांऐवजी जनावरांच्या चार्‍यासाठी मका पिकाच्या पेरणीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मक्याचे उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र 1 हजार 705 हेक्टर इतके असताना प्रत्यक्षात 2 हजार 168 हेक्टरवर (127 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. इंदापूरमध्ये सर्वाधिक 922 हेक्टर आणि खेडमध्ये 348 हेक्टरवर मका लागवड झाल्याचे काचोळे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT