पुणे

ऑनलाइन एमबीएची क्रेझ : बायोडेटाचे वजन वाढण्यासह व्यावसायिक ज्ञानातही भर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए या अभ्यासक्रमाला सध्या औद्योगिक, आयटी, आरोग्य, मार्केटिंग, शिक्षण आदी क्षेत्रात प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थी पूर्णवेळ हा अभ्यासक्रम शिकतात. परंतु अलीकडे हाच अभ्यासक्रम ऑनलाइन शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यातून विद्यार्थ्यांचा बायोडाटा तर वजनदार होतोच, शिवाय त्यांच्या व्यावसायिक ज्ञानातही भर पडत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

विद्यार्थी पदवीनंतर पदव्युत्तर पदवी म्हणून एमबीए करतात. त्यामुळे त्यांना नोकरीच्या वेगवेगळ्या संधी प्राप्त होतात. एचआर, फायनान्स, मार्केटिंग यांसह एमबीए अभ्यासक्रमांतर्गत 11 प्रमुख विषय आणि 35 वैकल्पिक विषय समाविष्ट आहेत. यातील काही महत्त्वाच्या विषयांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम काही शैक्षणिक संस्थांनी सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या विविध संधी निर्माण होत आहेत. यातूनच ऑफलाइन एमबीएबरोबरच नोकरी करणार्‍या तरुणांमध्ये ऑनलाइन एमबीएचे महत्त्व वाढीस लागले आहे. तज्ज्ञांनी दिसेल्या माहितीनुसार, ऑनलाइन एमबीए ही एमबीएची पदवी मिळवण्याची एक उत्तम आणि सोयीस्कर पद्धत आहे. याचे काही फायदे देखील आहेत.

ऑनलाइन एमबीएमध्ये विद्यार्थ्यांना किंवा नोकरदार तरुणांना त्यांच्या वेळेनुसार शिकण्याची परवानगी मिळते. विद्यार्थी पूर्णवेळ काम करत असला तरी त्याला संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. पारंपरिक एमबीएच्या तुलनेत ऑनलाइन एमबीए कमी खर्चाचा असतो. तुम्हाला प्रवास किंवा राहण्याचा खर्च करावा लागत नाही. भारतातील आणि परदेशाच्या विविध मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून ऑनलाइन एमबीए करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्यामुळे देशात राहूनही परदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्याचा अनुभ देखील विद्यार्थ्यांना मिळत आहे. बर्‍याच ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतात. त्यामुळे अभ्यासक्रम साहित्य पुन्हा पाहण्याचे आणि मूळ संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना हवा तेवढा वेळ मिळतो. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन एमबीएकडे कल वाढला आहे.

ऑनलाइन एमबीए शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडे स्व-अभ्यास आणि वेळ व्यवस्थापन कौशल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थी जर शिस्तबद्ध आणि स्वतंत्र शिकणारा असेल, तर ऑनलाइन एमबीए संबंधित विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या नोकरी करत असलेल्या किंवा पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकण्याची संधी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन एमबीए हा एक चांगला पर्याय आहे.

– प्रा. डॉ. ऋषीकेश काकांडीकर, सहयोगी प्राध्यापक, साईबालाजी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस.

हाही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT