परिंचे: दक्षिण पुरंदरमधील वीर, परिंचे, हरणी, तोंडल, माहूर, यादववाडी, पांगारे, हरगुडे या गावांतील तरकारी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून या भागात दिवसभर कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी, मध्येच पाऊस, कधी दिवसभर ढगाळ वातावरण आहे.
यामुळे कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी, गवार, कोथिंबीर, भोपळा या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकाला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. भुरी, जांभळा करपा आणि पीळरोग पडल्याने अनेक भागांतील कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (Latest Pune News)
पुरंदर तालुक्यातील वीर-परिंचे परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मध्यंतरी कांद्याला चांगला बाजारभाव होता. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात गरवी कांद्याची लागवड केली. मात्र, यावर्षी कांदा पिकावर वातावरणातील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर रोग पडला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
वातावरणातील बदलामुळे पिकावर भुरीचा प्रादुर्भाव होऊन मररोग वाढत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. गरवी कांद्याची रोपे तसेच पेरणी केलेल्या कांद्याला पीळ पडल्याने वेळीच औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे, असे उप कृषी अधिकारी संदीप कदमयांनी सांगितले.
पिकांवरील रोगराईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खतांचा आणि औषधांच्या खर्चाने शेतकरी बेजार झाला आहे, असे शेतकरी अंकुश वचकल यांनी सांगितले.