राहू : कांद्याचे दर कोसळल्याने दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अक्षरशः रडवणारी ठरली आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.(Latest Pune News)
मागील हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रमी कांद्याची लागवड करण्यात आली होती. प्रतिकूल हवामान असतानाही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले; मात्र कांद्याला विक्री दर फारच कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करण्यासाठी नवीन वखारी बांधून त्यामध्ये कांदा संग्रहित केला. परंतु, हवामानातील बदलांमुळे वखारीतील कांदाही सडला आहे.
दौंड, शिरूर, पुरंदर, अहिल्यानगर या पट्ट्यातील शेतकऱ्यांना सध्या प्रतिक्विंटल कांद्याला 700 ते 900 रुपये एवढाच दर मिळत आहे. दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र 1 हजार 500 ते 1 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल इतका असल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. कांदा पिकातून किमान खर्चतरी निघणे अपेक्षित होते; मात्र निर्यातीवर निर्बंध आणि बाजारातील मागणी घटल्यामुळे कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर पडले आहेत.
घरचा सहा एकर कांदा होता. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर आणखी 600 पिशवी कांदा 13 रुपये प्रतिकिलो दराने घेऊन वखारीत ठेवलेला होता. मात्र, सध्या निम्म्याहून अधिक कांदा सडला असून, उत्पादनखर्चही वसूल झाला नाही. - बाबूराव कदम, कांदा उत्पादक शेतकरी
कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना पुरेशी सोय आणि सरकारी हस्तक्षेप गरजेचा आहे. बाजार स्थिर ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे.अनिल सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी