चाकण : पुढारी वृत्तसेवा : कांद्याबाबत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. बुधवारी (दि. 21) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊन दरात देखील घसरण झाल्याचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी हटवली जाईल, अशा बातम्यांमुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, कांदा निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत कायम राहणार आहे. याचा थेट फटका कांद्याच्या मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेवर आणि दरावर झाला आहे.
यंदा हंगामात कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. ग्राहकांना वाजवी दरात पुरेसा कांदा उपलब्ध व्हावा, हा यामागील मुख्य हेतू असल्याचे केंद्र शासनाचे म्हणणे आहे. निर्यातबंदी उठविल्याच्या वृत्तानंतर घाऊक कांदा बाजारपेठांत कांद्याचे दर 40.62 टक्क्यांनी वाढून 1 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल झाले. मात्र, कांद्यावर निर्यातबंदी असल्याचे स्पष्ट झाल्याने दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
सध्या कांद्याचा हंगाम सुरू आहे. मार्चपर्यंत शेतकर्यांचा कांदा मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये येत असतो. दि. 31 मार्चपर्यंतच्या काळात कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्यास निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव आणखी खाली येतील, अशी भीती व्यक्त होत आहे. एकदा शेतकर्यांचा कांदा संपला की निर्यातबंदी हटवली, तरी त्याचा फायदा केवळ निर्यातदार कंपन्यांना होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बुधवारी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याची 9 हजार 500 पिशवी म्हणजे 4 हजार 750 क्विंटल आवक झाली. कांद्याला सरासरी 1 हजार ते 1 हजार 500 रुपये दर मिळाल्याचे शेतकर्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा