हिंजवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाकड येथील भूमकर चौक ते हिंजवडी मार्ग एकेरी करण्यात आला आहे. परंतु, हा रस्ता सध्या वाहतूककोंडीच्या समस्येत सापडला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे.
हिंजवडी येथे मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. दररोज सुमारे 15 ते 20 मिनिटे वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणारे आयटीयन्स हैराण झाले आहेत. हिंजवडीला जाण्यासाठी वाकड येथून तीन रस्ते जातात. डांगे चौकातून वाकड-दत्त मंदिर रस्ता मार्गे हिंजवडीला जाता येते. त्याचप्रमाणे काळेवाडी फाटा येथून वाकड मार्गे हिंजवडीला जाण्याची सोय आहे. तसेच, भूमकर चौकातूनही वाकडला जाता येते. या तिन्ही रस्त्यांवरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते.
भूमकर चौक मार्गे खड्ड्यांतून वाट काढत थेरगाव डांगे चौकातून गणेशनगर मार्गे भूमकर चौक हिंजवडी या रस्त्यावर यावे लागते. या रस्त्यावर सर्वांधिक वर्दळ असते. भूमकर चौकात मोठंमोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे भूमकर चौकापासून पुढे हिंजवडीला जाणार्या रस्त्यावरदेखील खड्डे पडलेले आहेत.
मागील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू असून, खड्डे चुकवत चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. बर्याचदा या खड्यांमध्ये पाणी साचलेले असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटे-मोठे अपघातदेखील होतात. यासह विनोदेवस्ती येथील कॉर्नरशेजारीच मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असते. त्यामुळे वाहने सुमारे दीड-दोन फूट पाण्यातून वाट काढत असतात.
हिंजवडी येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे एचडीएफसी बँकेजवळ वाहनाने ये-जा करताना दररोज किमान 15 ते 20 मिनिटे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. कस्पटेवस्ती वाकड रस्त्यावरही कोंडी असते. काळेवाडी फाटा येथून कस्पटेवस्ती वाकड रस्त्याने पुढे हिंजवडीला जाणार्या रस्त्यावरदेखील सकाळी आणि सायंकाळी वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरदेखील वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
हेही वाचा