पीएमपीच्या ताफ्यात येणार एक हजार नव्या बस; व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय  File Photo
पुणे

Pune PMP Bus: पीएमपीच्या ताफ्यात येणार एक हजार नव्या बस; व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय

पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेसह पीएमआरडीएचाही खरेदीत सहभाग

प्रसाद जगताप

पुणे: पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा भार पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडवर आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सेवा सुधारण्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए मिळून तब्बल एक हजार बस खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 13) व्यवस्थापकीय मंडळाची बैठक पार पडली असून, तीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

या बैठकीला पीएमपी व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीला पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते. (Latest Pune News)

आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, आज झालेल्या पीएमपीएमएलच्या बैठकीत पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका मिळून 500 बस खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. या सर्व बस सीएनजीवर धावणार असून दोन्ही महापालिका 60 आणि 40 टक्के असा निधीचा हिस्सा बस खरेदीसाठी देणार आहेत.

पीएमआरडीए सुद्धा 500 बस खरेदी करणार असून याला व्यवस्थापकीय मंडळाने मान्यता दिल्याने वेगाने बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.पीएमपीएमएलसाठी एक हजार बसची खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये शासन निधीचा हिस्सा नसणार आहे. दोन्ही महापालिका खरेदीसाठी सक्षम असल्यामुळे ही खरेदी केली जाणार आहे.

यामध्ये मेट्रोला फिडर बस सेवा पुरवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये मोठ्याप्रमाणावर पीएमपीच्या बस धावत आहेत. त्यामुळे पीएमआरडीए सुद्धा स्वतंत्र 500 बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अधिक बस उपलब्ध होतील.

पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला होता. यासाठी नव्या बस खरेदीचा विचार सुरू होता. मंगळवारी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड व्यवस्थापकीय मंडळाची बैठक झाली असून, या बैठकीत एक हजार बस खरेदीचा निर्णय झाला आहे. या बस खरेदी केल्यावर शहरातील वाहतूकव्यवस्था आणखी वेगवान होणार आहे.
डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT