पुणे: ‘राज्यात आजपासून ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ योजना सुरू करण्यात आली असून, एका जिल्ह्यात कोणत्याही नोंदणी कार्यालयात जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. पुढील काही दिवसांत ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ धोरण अमलात आणणार असून, राज्यात कुठूनही जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येतील,’ अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
‘वन ड्रिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ ही योजना सर्वात आधी मुंबईत लागू करण्यात आली. त्यानंतर आता ती राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामुळे एका जिल्ह्यातील दस्त नोंदणी त्या जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयातून करता येणार आहे. जमीन किंवा सदनिकेसाठी पूर्वी नेमून दिलेल्या दस्तनोंदणी कार्यालयात जाण्याची आता गरज नाही. (Latest Pune News)
आपल्या सोयीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयातून ही नोंदणी करता येईल. याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ लागू झाले असून, ’वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ हे धोरण अमलात येणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील जमीन अथवा सदनिकेची दस्त नोंदणी कोणत्याही नोंदणी कार्यालयातून करता येणार आहे.’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 140 कोटी भारतीयांचे संरक्षण करण्यासाठी खंबीर आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मोदी यांना अजून ओळखलेले नाही. राऊतांना टीका-टिप्पणी करण्याशिवाय दुसरी भाषा येत नाही. पाकिस्तान आणि नक्षलवादाचा बीमोड केल्याशिवाय मोदी गप्प बसणार नाहीत. राऊत चिथावणीखोर असून, ते रोज सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत,’ अशी टीका बावनकुळे यांनी केली.
फडणवीस-शिंदे-पवार भावा-भावांसारखे
‘देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार भावांसारखे काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्याला अष्टपैलू मुख्यमंत्री मिळाला आहे. शिंदे आणि पवार यांना पक्ष वाढविण्याची मुभा आहे. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची भावना व्यक्त करायला कोणाचा विरोध नाही. पक्ष वाढविण्यासाठी ते करावे लागते,’ अशी टपली बावनकुळे यांनी मारली.
विमानतळासाठी शेतकर्यांसोबत करणार चर्चा
‘विकास करण्यासाठी जमिनींचे संपादन करावे लागते. पुरंदरच्या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्याचे स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार आहे. भूसंपादनाबाबत शेतकर्यांचे काही प्रश्न असतील, तर भूसंपादन खात्याचा मंत्री म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करीन. जमिनीचे दर, मुलांना नोकरी, असे प्रश्न सोडविण्यात येतील. गरज असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. मात्र, शेतकर्यांवर लाठीमार नको,’ अशी भूमिका असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून काढणार
महसूल विभागात कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. आज अनेकांचे निलंबन करण्यात आले आहे. गरज पडली तर उद्या बडतर्फ करू. आमच्या सरकारमध्ये पैसे घेणे चालणार नाही. महसूल विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून काढू आणि दोषींवर कारवाई करू, अशा इशारासुद्धा बावनकुळे यांनी दिला.