मुबलक पाणी, तरीही टंचाईच्या झळा; तब्बल दीड लाख पुणेकर टँकरवर अवलंबून File Photo
पुणे

Water Crisis: मुबलक पाणी, तरीही टंचाईच्या झळा; तब्बल दीड लाख पुणेकर टँकरवर अवलंबून

पुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांची भटकंती

पुढारी वृत्तसेवा

Water Crisis in pune

पुणे: राज्यात सर्वाधिक प्रगत शहर म्हणून ओळख असणार्‍या पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळी आली आहे.

एकिकडे दक्षिण पुण्यात पाणी कपात लागू केली असतांना शहरातील तब्बल दीड लाख नागरिक हे टँकरच्या पाण्यावर विसंबून आहेत. यामुळे टँकरमाफियांचे फावले असून जादा पैसे घेऊन पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक त्रास झाले आहेत. (Latest Pune News)

महापालिकेला शहरासह उपनगर भागात पाणी पुरवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाण्याची मागणी वाढली असून नागरिकांचे सातत्याने फोन येत असल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकारी त्रस्त झाले आहेत.

पालिकेत नव्याने सामाविष्ट झालेल्या गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश गावे ही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. तर शहरात असलेलीय मुख्य जलवाहिन्या या जुन्या झाल्याने त्या वारंवार फुटत असून त्यामुळे देखील पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. परिणामी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर रोज दीड लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

धरणात पाण्याचा मुबलक साठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. तरी सुद्धा नागरिकांना पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिक संतप्त झाले आहेत. जेथे जलवाहिन्यांचे जाळे नाही, त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे आहेत. मात्र, पाण्याची मागणी जास्त असल्याने ही केंद्रे कमी पडत आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागात व नव्याने पालिकेत आलेल्या 34 गावांतील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या भागात स्वतंत्र व प्रभावी पाणीपुरवठा योजना नसल्याने या गावांमध्ये रोज महापालिकेकडून तब्बल 1050 टँकरद्वारे रोज पाणी पुरवठा केला जातो.

पुण्यात आठ टँकर भरणा केंद्रे

वडगावशेरी, रामटेकडी, सासवडफाटा, धायरी, पटवर्धनबाग, पर्वती, पद्मावती आणि चतुःशृंगी येथे पालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे आहेत. येथून रोज 1400 टँकर पाणी वितरित होते. यातील 1050 टँकर हे समाविष्ट 34 गावांना आणि 350 टँकर पाणी जुन्या शहरातील नागरिकांना पुरवले जाते. मात्र, हे पाणी अपुरे आहे.

टँकर लॉबी सक्रिय

शहरात खासगी टँकर लॉबीदेखील रोज 250 ते 300 खासगी टँकर महापालिकेच्या केंद्रांवरून पाणी भरून नेतात आणि ते प्रति 10 हजार लिटरसाठी 1500 ते 2 हजार रुपयांना नागरिकांना विकले जातात. या टँकर फेर्‍यांची संख्या वर्षाला तब्बल 4 लाखांच्यावर आहे.

टँकरद्वारे 17 ते 18 एमएलडी पाण्याचा पुरवठा

पालिका व खासगी टँकर मिळून शहरात दररोज सुमारे 17 ते 18 एमएलडी पाणी दिले जाते. तर संपूर्ण शहराला पालिका दररोज सुमारे 1750 एमएलडी पाणी देते. यात टँकरने पाणी पुरवण्याचे प्रमाण 1 ते सव्वा टक्के आहे. शहराला वर्षाला 20.60 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ 14.62 टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, गळतीमुळे तब्बल 35 टक्के पाणी वाया जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT