पुणे

पुणे : बकोरियांना परत पाठवा ! पीएमपी कामगारांची सोशल मिडीयावर मोहिम

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी कामगार आणि प्रवाशांच्या हितासह पीएमपीच्या विकासाचा विचार करणार्‍या अधिकार्‍याची शासनाने बदली केल्यामुळे पीएमपी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, बकोरिया यांची बदली करून पुन्हा पाठवा, याकरिता कामगार आणि संघटनांनी सोशल मिडीयावर मोहिम हाती घेतली आहे. पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच बदली केलेलाच अधिकारी आम्हाला पुन्हा द्यावा, अशी मागणी पीएमपीच्या वर्तुळातून जोर धरत आहे. अगदी तळागाळातील कामगारांकडून सुध्दा या मागणीला जोर असून, 'देवमाणूस' गमावल्याच्या भावना पीएमपी कर्मचार्‍यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

पीएमपी कर्मचार्‍यांनी तर सोशल मिडीयावर बकोरिया यांना परत पाठवा, या मागणीची मोहिम हाती घेतली असून, प्रत्येकाच्या व्हॉटसअप स्टेटस आणि इन्स्टाग्राम, फेसबुक स्टोरीला बकोरिया यांचा फोटो असून, त्यात बकोरिया यांना पुन्हा परत पाठवा, अशी मागणी पीएमपीच्या वर्तुळातून होत आहे. बकोरिया यांनी अवघ्या नऊ महिन्यांच्या काळात कामगार हिताचे निर्णय घेऊन कामगारांच्या मनात घर केले होते. त्यांनी पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचार्‍यांची प्रत्यक्ष संवाद साधला.

त्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. महिलांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यामुळे पीएमपी कर्मचार्‍यांकडून बकोरिया यांना पुन्हा पाठवा, ही मागणी जोर धरत आहे. पीएमपीतील संघटना आणि कर्मचार्‍यांकडून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल देखील पाठविण्यात येत आहे. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदे पीएमपी कर्मचार्‍यांची ही मागणी पुर्ण करणार का, हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT