पुणे

चिंचवडच्या सिटी सेंटरसाठी अधिकार्‍यांचा सिंगापूर दौरा

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे नियोजित सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी सिंगापूर दौर्‍यावर रवाना झाले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्यासह पालिकेच्या 4 व राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या एका अधिकार्याचा यात समावेश आहे. मुंबई, नवी दिल्ली आणि परदेशातील व्यापारी संकुलाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील चिंचवड येथे सिटी सेंटर हे व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागारी संस्थेमार्फत दोन परदेश दौर्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी दुबईचा दौरा केला होता. या दौर्‍यानंतर अधिकार्‍यांच्या दुसरा दौरा सिंगापूर येथे आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता विजय भोजने यांचा समावेश आहे.

तर, शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांचाही या दौर्‍यात समावेश आहे. सिंगापूर येथे विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास, त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा दौरा असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
दरम्यान, अधिकार्‍यांना दौर्‍यावर पाठवले जाते. परंतु, ते त्या नियोजनात कायम राहत नसतात. त्यामुळे अधिकार्‍यांचे हे दौरे या प्रकल्पासाठी उपयोगी ठरते की केवळ पर्यटन होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT