मंचर: सर्पदंश झालेल्या आईला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करीत निगडाळे (ता. आंबेगाव) येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान बापू सीताराम भोईर हे देशसेवेसाठी श्रीनगर येथे रवाना झाले. निरोप देताना त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. मात्र, बापू यांच्या आईने देशसेवेसाठी निघालेल्या त्यांच्या मुलाला हसत हसत निरोप दिला.
निगडाळे येथील बापू सीताराम भोईर हे कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत. त्रिपुरा, श्रीनगर भागात त्यांनी 13 वर्षे देशसेवा केली आहे. सध्या ते पहलगाम येथे कार्यरत आहेत. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक महिन्याची सुट्टी काढून ते 29 एप्रिल रोजी गावी आले होते. (latest pune news)
गावी आल्यानंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवत असताना शुक्रवार, दि. 2 मे रोजी दुपारी साडेअकरा वाजता त्यांची आई पार्वताबाई भोईर (वय 60) यांना भात खाचराची भाजणी करताना फुरसे या विषारी जातीच्या सर्पाने दंश केला.
प्रथम त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना प्रकृती बिघडल्याने त्यांना नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सर्प व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आईची देखभाल करत असतानाच भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांची रजा रद्द करण्यात आली व त्यांना दि. 8 मे रोजी तातडीने पहलगाम भागातील कुलग्राम येथे कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश आले.
आईच्या पुढील उपचाराची सर्व जबाबदारी कुटुंबीयांवर सोपवून ते पहलगाम येथे जाण्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देताना कुटुंबीय व त्यांच्या आईच्या डोळ्यांत अश्रू आले. भोईर हे जवान असल्याचे डॉ. राऊत यांना समजले असता त्यांचेही मन गहिवरून आले. त्यांनी भोईर यांचा सत्कार करत देश सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
’आईची काळजी करू नका, आम्ही आईची काळजी घेतो, तुम्ही देश सेवेसाठी जा,’ असे डॉ. राऊत यांनी सांगताच जवान भोईर यांनाही गहिवरून आले. दरम्यान पार्वताबाई यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.