Obscene videos case
पुणे: माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई व शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइमधील हिडन फोल्डरमध्ये विविध महिलांचे तब्बल 252 व्हिडीओ आणि 1 हजार 497 फोटो आढळून आले आहेत. हे सर्व फोटो अश्लील व आक्षेपार्ह असून महिलांना चित्रपटातील प्रलोभन, नशा करण्यास भाग पाडून चित्रित केले आहेत.
याद्वारे मोठ्या प्रमाणात महिलांची तस्करी झाल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे, याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकाला एसआयटी स्थापन करून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याबाबत पत्र आम्ही दिले आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. (Latest Pune News)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आपत्तीजनक चॅटिंग आढळून आली आहे. एवढेच नाही
तर घरातील काम करणार्या मोलकरणीचेही अश्लील फोटो मिळून आले आहेत. या व्हिडीओ व फोटोपैकी 234 फोटो व 19 व्हिडीओ अत्यंत अश्लील स्वरुपाचे आहेत. मुलींना पटविण्यासाठी आणि मुली पुरविण्यासाठी डॉ. खेवलकर यांनी आरूष नावाचा माणूस ठेवला होता. या चॅटिंगमध्ये चित्रपटांत शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधण्यात आला आहे. चित्रपटात संधी देतो, असे सांगून त्यांचा वापर करण्यात आला. तसेच, त्यांचे खर्चाचेही पैसे दिले नसल्याचे या चॅटिंगमध्ये दिसून आले आहे.
परराराज्यातून मुलींना बोलावून तसेच राज्यातून मुलींना पाठवून मोठ्या प्रमाणात त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ मिळाले. मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार करून व्हिडीओ काढलेले आहेत. या व्हिडीओचा वापर मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात आला, असा गंभीर आरोपही चाकणकर यांनी या वेळी केला.
पुण्यातील ड्रग पार्टी प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोबे, श्रीपाद मोहन यादव तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुण्यात ताब्यात घेण्यात आले होते. पार्टीच्या ठिकाणाहून 41 लाख 35 हजार किमतीचा कोकेन, गांजा, दहा मोबाईल, हुक्का पॉट, दारूच्या बॉटल तसेच इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.