येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी परिसरातील स. नं. 46 मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या 'सेंकड फेज'मध्ये पात्र लाभार्थींच्या यादीत त्या ठिकाणी वास्तव्यास नसलेल्या लोकांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत 'एसआरए'च्या अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. या योजनेचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून बोगस लाभार्थींना पात्रता यादीतून वगळून टाकावे, बोगस करार करून घेणार्या विकसकावर कारवाई व्हावी, अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी यांच्याकडे केली आहे.
स. नं. 46 मधील झोपडपट्टीधारकांसाठी विकसकाने दुसरी इमारत तयार केली आहे. या ठिकाणी सुमारे दीडशे फ्लॅट बांधण्यात आले आहेत. यामधील 101 पात्र लाभार्थींना घरे देण्यात येणार आहेत. मात्र, पात्रता यादीमध्ये सं. नं. 46 मध्ये कधीही वास्तव्यास नसलेल्या लोकांना घरे व दुकाने मंजूर झाली आहेत. काही नावे विकसकाच्या जवळच्या लोकांची आहेत. या यादीत बोगस लाभार्थींचा समावेश असल्याचे आढळून येते. बोगस कागदपत्रे तयार करून देणार्यालाही विकसकाने पात्र करून घेण्यास सांगितले आहे.
विकसकाने या लाभार्थ्यांना वास्तव्यास नसतानाही स्वतः करारनामा करून दिला आहे. रस्ता रुंदीकरणात घरे बाधित झाली नसतानाही घरे बाधित झाल्याचे दाखवून नवीन घरासाठी पात्र करून घेतले आहे. बाहेरच्या लोकांची नावे पात्रता यादीत आल्यामुळे या ठिकाणी वर्षेनुवर्ष राहणार्या रहिवासी घरांपासून वंचित राहिले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी म्हणाल्या की, महापालिकेने सर्व्हे करून लाभार्थी लोकांची नावे आमच्याकडे दिली होती. त्यानुसार कागदपत्रे तपासून पात्रता यादी तयार केली आहे. तरीदेखील नव्याने आलेल्या तक्रारीनंतर जे कोणी बाहेरचे असतील किंवा ज्यांच्या नावे अन्य कुठे घर असेल त्यांची चौकशी करून संबंधितांची नावे वगळण्यात येतील. तसेच सं. नं. 46 मध्ये राहणारे नव्याने पुरावे देतील, त्यांची नावे पात्र करण्याचा विचार केला जाईल.
पात्रता यादी तयार करण्याचे काम 'एसआरए'ने केले आहे, त्यामुळे जे कोणी बाहेरचे असतील त्यांचा निर्णय 'एसआरए'च्या अधिकार्यांनी घ्यावा.
-प्रमोद अग्रवाल, विकसक
आमच्या तीन पिढ्या याठिकाणी राहात आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. तरीही माझे नाव पात्रता यादीत आले नाही. नावे पात्र करताना मोठा गैरव्यवहार झाला आहे. फेरसर्वेक्षण करून बाहेरच्या लोकांची नावे यादीतून काढून आम्हाला घरे देण्यात यावीत.
-रवी नगरे, रहिवासी, स. नं. 46
हेही वाचा